Mon, May 20, 2019 22:19होमपेज › Konkan › चिपी येथे बुधवारी विमान उतरण्याची शक्यता कमीच

चिपी येथे बुधवारी विमान उतरण्याची शक्यता कमीच

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:25PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील चिपी येथील विमानतळावर 12 सप्टेंबर रोजी विमान लँडिंगची शक्यता धुसर झाली आहे. भारत सरकारच्या नागरी विमानवाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएची परवानगी अद्याप मिळालेली नाही. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाईवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करून 12 रोजी विमान उतरावे की नाही, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र, 10 सप्टेंबरला कमीतकमी ट्रायल लँडिंग तरी होईल, अशी माहिती  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

पालकमंत्री दीपक केसरकर आणि खा. विनायक राऊत यांनी 12 सप्टेंबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर विमान उतरण्याची घोषणा केली होती. तर भाजपकडून मात्र दिवाळीनंतरच विमान उतरू शकेल, असे सांगितले जात होते. त्यामुळे खरोखरच या विमानतळावर 12 रोजी विमान उतरणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शनिवारी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे कणकवलीत आले असताना त्यांच्या समवेत पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. पत्रकारांनी याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे? 12 तारीखला विमान उतरणार की नाही? असे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता ना. केसरकर यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली.

ते म्हणाले, 12 तारीखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गात येणार होते.त्यामुळे डीजीसीएने (नागरी विमानवाहतूक महासंचालनालय) चिपी विमानतळाची पाहणी केली. डीजीसीएचे असे म्हणणे आहे, हा खासगी विमानतळ आहे. याचे अजून लायसनिंग झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याला परवानगी द्यावी. परंतु महाराष्ट्र शासनाचे या विभागाचे जे मुख्य कॅप्टन कर्वे आहेत, जे परवानगीबाबतचे काम बघतात, त्यांचे असे म्हणणे आहे की, जुन्या विमानतळानाच महाराष्ट्र शासन परवानगी देवू शकते. त्यामुळे या विमानतळाला डीजीसीएनेच परवानगी द्यावी. आज रात्री आपण दिल्लीला जात आहे. 10 तारीखला ट्रायल लँडिंगसाठी विमान उतरविण्याची परवानगी मिळालेली आहे. मात्र, डीजीसीएची परवानगी नसेल तर व्हीआयपींचे विमान  या विमानतळावर  उतरू शकत नाही, एवढाच प्रश्‍न आहे. शेवटी आम्हीच घोषित केले होते की 12 तारीखला मुख्यमंत्री येथे येणार आहेत. त्यामुळे जरी नुसते विमान उतरावयचे असेल तर मुख्यमंत्री आणि ना.प्रभू यांच्या कानावर ही गोष्ट घालावी लागणार आहे. त्यांना डावलून आम्ही विमान उतरविले, असे होता कामा नये. विमान उतरविण्याचा उद्देश असा आहे, गणपतीपूर्वी आम्ही विमान उतरवू अशी घोषणा ना. प्रभू यांनी केली होती. त्यासाठी आम्ही डीजीसीएकडे वनटाईम लँडिंगची परवानगी मागीतली होती. परंतु ती ज्या अटीवर देण्यात आली ती अट महाराष्ट्र शासन स्वीकारू शकत नाही.

ना.केसरकर म्हणाले, आजची स्थिती अशी आहे, ऑपरेटरने आयआरबीकडे विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी मागितली आहे.जर मुख्यमंत्री आणि ना.प्रभू म्हणाले विमान उतरवा, आमची काहीही हरकत नाही, तर प्रश्‍नच नाही. 12 तारीखला मुख्यमंत्री, ना. प्रभू आणि उध्दव ठाकरे येणार असल्याने काळजी म्हणून आम्ही 10 तारीखला ट्रायल लँडिंग करणार होतो, तशी तयारी ऑपरेटरने  केली आहे.  ऑपरेटरने विमानतळाची पाहणी केली आहे. ऑपरेटरची विमान उतरविण्यासाठी कोणतीही हरकत नाही. जर आम्ही विमान उतरविले तर मुख्यमंत्री आणि ना. प्रभूंना याची कल्पना द्यायला हवी आणि नाही उतरविले तर सिंधुदुर्गातील जनता म्हणणार, 12 तारीखला विमान उतरविण्याची घोषणा केली होती आणि विमान उतरविले नाही. त्यामुळे यामध्ये थोडा पेच आहे. म्हणून आपण शनिवारी रात्री दिल्लीला जात आहे. दिल्लीत मुख्यमंत्री आहेत. तेथे जावून मुख्यमंत्री आणि ना. प्रभू यांची भेट घेणार आहे.  त्यांच्याशीच चर्चा करायला हवी, कारण 12 तारीखला येणार असल्याचे त्यांनी मान्य केले होते. आता हे त्यांच्या कानावर घालावे लागेल आणि विमान नाही उतरविले तर जनता म्हणणार यांनी घोषणा करून विमान उतरविले नाही. त्यामुळे कमीत कमी ट्रायल लँडिंग तरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात मुख्यमंत्री आणि ना. प्रभू यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे 12 तारीखला व्हीआयपीच नव्हे तर नुसते विमानही उतरण्याची शक्यता धूसर झाली आहे.