Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Konkan › चिपी विमानतळ श्रेयासाठीच पालकमंत्र्यांना पोटदुखी!

चिपी विमानतळ श्रेयासाठीच पालकमंत्र्यांना पोटदुखी!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:26PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सत्तेत असताना सिंधुदुर्गात चिपी विमानतळ प्रकल्प मी आणला. जिल्ह्यात विमानतळ व्हावे हे माझेच स्वप्न होते.  त्यासाठी  आवश्यक  सर्व  परवानग्या घेऊन 2014 पूर्वीच हा प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे या प्रकल्पामध्ये मी खो का घालू? असा सवाल करत, विमानतळाच श्रेय मला मिळू नये म्हणून पालकमंत्री केसरकर यांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खा.  नारायण राणे यांनी केली. 

सावंतवाडी येथील रवींद्र नाट्य मंगल कार्यालयात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ प्रणिता पाताडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतरकर, विकास कुडाळकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. गीता परब, शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, नगरसेवक राजू बेग आदी उपस्थित होते. 

खा. नारायण राणे म्हणाले,  चिपी  विमानतळासाठी जागा संपादीत करण्या करिता आपणाला संघर्ष करावा लागला. प्रसंगी लढावे लागले. त्यानंतर 2014  ला या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन विमान लँडिंग आणि टेक ऑफसाठी रनवे  बांधून पूर्ण केला. मात्र पालकमंत्री केसरकर यांना या विमानतळावरून विमानाची चाचणी घेण्यासाठी चार वर्षे लागली हे  दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. येत्या 12 सप्टेंबरला विमानतळाची चाचणी होणार असून त्यासाठी मला खुद्द केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री  सुरेश प्रभू यांनी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे केसरकर यांच्या पोटात दुखत असल्याची टीका खा. राणे यांनी केली. 

राज्यात 5 प्रमुख पक्ष आहेत त्यांनी निवडणूक काळात काढलेल्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांची पूर्तता केलेली नाही. उलट जनतेला फसवण्याचेच काम केले आहे. मात्र, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीच मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जन्माला घातला आहे, असे खा. राणे म्हणाले. सावंतवाडी तालुका मोठा असून या तालुक्यातून पक्षाची 1 लाख सभासद नोंदणी झाली पाहिजे ,  अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली.  सिंधुदुग आज महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांशी   स्पर्धा करू पाहत आहे. मात्र, गेल्या चार वर्षात या जिल्ह्याची काय अवस्था झाली आहे ते पहा, पालकमंत्र्यानी जिल्ह्याची पार दुर्दशा करून टाकली आहे. चारपदरी महामार्गाचे काम अर्धवट आहे. राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय बनला आहे,चार महिने झाले तरी जिल्हा नियोजनची सभा नाही, आदी मुद्दयांकडे लक्ष वेधत ना. केसरकरांकडे विकासाची दूरदृष्टी नसल्याचा टोला त्यांना लगावाला. पक्षाची  सभासद नोंदणी करताना ही वस्तुस्थिती कार्यकर्त्यानी जनतेसमोर मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यानी नुसते सभासद न होता तळागाळात जाऊन काम करा. जनतेला पक्षाची भूमिका समजावून सांगा, काम करून दाखवा, मी सलाम करेन, असे आवाहन  खा. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, येणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर सभासद नोंदणी आवश्यक आहे. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. चांदा ते बांदा योजनेत जिल्ह्यात एकही रुपयांचे काम झालेले नाही, फक्त बैठक घेण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही  त्यांच्यासारखे अकार्यक्षम मंत्री मी पाहिलेला नाही. जिल्ह्याला पूरहानीचे पैसे नाही मिळाले, वनसंज्ञेचे प्रश्‍न सुटले नाही, 2014 मधील आश्‍वासनांची पूर्तता अद्याप झाली नाही. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे,असे ते म्हणाले.