Mon, Sep 24, 2018 04:04



होमपेज › Konkan › नारायण राणे लवकरच मंत्री : फडणवीस

नारायण राणे लवकरच मंत्री : फडणवीस

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 20 2017 2:34AM

बुकमार्क करा





नागपूर : उदय तानपाठक

गुजरातमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजप सरकार आणखी स्थिर झाले आहे, असा दावा करताना कोलांटउड्या मारण्याच्या बेतात असलेले अनेकजण आता भानावर येतील, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला. नारायण राणे यांना नक्‍की मंत्रिमंडळात घेतले जाईल  आणि लवकरच ते मंत्री होतील, असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्याचवेळी खडसे आणि राणे हे आऊट स्पोकन असले, तरी पक्षासाठी असेटच आहेत, असेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत!

हिवाळी अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या मुंबईतील पत्रकारांच्या ‘सुयोग’ या निवासी शिबिरात अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर आपली मते व्यक्‍त केली. गुजरातेत भाजपला 49.4 टक्के मते मिळाली. सुमारे पन्‍नास टक्के मते मिळवणार्‍या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी देशात फार कमीवेळा मिळाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रात भाजपच सातत्याने नंबर एकचा पक्ष असल्याचे झालेल्या निवडणुकांत सिद्ध झाले असून, शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे सगळेच पक्ष विरोधात असतानाही भाजपनेच यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत, मतदारांनी भाजपबरोबरच शिवसेनेलाही मतदान केले असून, त्यातून अजून त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जाण्याची मानसिकता नाही, हेच दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत आणि पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे, असे सांगत खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता नाही, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

गुजरातेत राष्ट्रवादीने काँग्रेसचे मतविभाजन केले म्हणून भाजपच्या 99 जागा आल्या, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेमुळे काँग्रेसच्या 754 जागा आल्या, असे समजण्याइतके हास्यास्पद आहे, असा टोला फडणवीस यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना लगावला. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेनेने सरकारविरोधी वक्‍तव्ये करणे आपल्याला पटत नसले, तरी आमचे सेनेशी चांगलेच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत विदर्भाच्या बाहेरून आलेले लोक अधिक होते, त्यांच्या यात्रेदरम्यान झालेल्या एकाही सभेला तीनशेपेक्षा जास्त लोक नव्हते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.