Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Konkan › चिपळुणात ‘पॉस’ मशिनची तपासणी सुरू

चिपळुणात ‘पॉस’ मशिनची तपासणी सुरू

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 8:26PMचिपळूण : खास प्रतिनिधी

‘पॉस’ मशिनला रेंज मिळत नसल्याने तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये धान्य वितरण बंद आहे. याचा फटका तालुक्यातील 21 हजार शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. यामुळे पुरवठा विभागाकडून पॉस मशिन तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. तीन-चार दिवसांत चिपळूण तालुक्यातील धान्य वितरण सुरळीत होईल, असे पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी पत्रकारांना सांगितले.

तालुक्यात 147 रास्तदर धान्य दुकान आहेत. या सर्व दुकानांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, मशिनला रेंज मिळत नसल्याची ओरड धान्य दुकानदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दुकानदार ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी जाऊन पॉस मशिनमध्ये माहिती नोंदवित आहेत. हे सर्व करणे त्रासदायक ठरत असल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, आधारकार्डशी रेशनकार्ड लिंक केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी शासनाने कार्डधारकारच्या हाताचे ठसे घेतल्याशिवाय धान्य देऊ नये, असे आदेश दिले होते. मात्र, इंटरनेट व रेंज मिळत नसल्याने धान्य वितरणाची व्यवस्था कोलमडली. तालुक्यातील 21 हजार कार्डधारकांना याचा फटका बसला आहे.

रेशन दुकानदारांनी त्यामुळे पॉस मशिन जमा करण्यास सुरुवात केली. पहिल्याप्रमाणे धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली होती. या पार्श्‍वभूमीवर पुरवठा विभागाचे उपसचिव जोगदंड यांनी रत्नागिरीत बैठक घेऊन रेशन दुकानदार चालक व मालकांशी चर्चा केली होती. यावेळी सर्व रेशनदुकानांमध्ये जाऊन पॉस मशिनला येणार्‍या अडचणी, इंटरनेट व रेंजची तपासणी करण्याच्या सूचना प्रत्येक तालुक्यातील पुरवठा अधिकार्‍यांना दिल्या होत्या. 

त्यानुसार चिपळूण तालुक्यात पॉस मशिन तपासणी सुरू झाली आहे. 147 पैकी 85 मशिनची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 55 मशिनचे दोष दूर करण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीनंतर ज्या ठिकाणी रेंज व नेट नाही, अशा ठिकाणी पूर्वीप्रमाणेच धान्य वितरणाची परवानगी दिली जाणार असल्याचे महसूलकडून सांगण्यात येत आहे.