Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Konkan › बदलत्या राजकारणाचा भाजपवर परिणाम नाही : विनोद तावडे 

बदलत्या राजकारणाचा भाजपवर परिणाम नाही : विनोद तावडे 

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:53PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

राजकारणातील व्यक्‍तिमत्त्व वर-खाली होत असते. त्यात भाजप सरकारने केलेले काम फारच चांगले आहे. त्यामुळे सध्याच्या बदलत्या राजकारणाचा भाजपच्या लोकप्रियतेवर किंवा प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्‍वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्‍त केला. छगन भुजबळ यांचा जामीन, त्यानंतर पंकज भुजबळ यांची ‘मातोश्री’ भेट व पालघरच्या वनगांचा सेना प्रवेश भाजपला तापदायक ठरेल का? अशा प्रश्‍नांना त्यांनी हे उत्तर दिले. अशा घटनांना राजकीय अर्थ लावण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

शिक्षणमंत्री तावडे गुरुवारी आडिवरे येथील तावडे अतिथी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. वनगा शिवसेनेत गेले. भुजबळांची ‘मातोश्री’ भेट अशा या राजकीय घडामोडी होत आहेत. या घटनांचा भाजपवर काही परिणाम होईल असा अनुमान काढणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. भुजबळ हे मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’ भेट ही जुन्या संबंधांतील जुळून आलेली घटना असून त्याचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही.

गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी मुंबई विद्यापीठाचा निकाल लांबणीवर पडू नये यासाठी नूतन कुलगुरूंनी गेल्यावर्षीचे दोष हेरून ते दूर करत आणले आहेत. गेल्यावर्षी निकाल लांबले तरी पुढील शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधला त्यांना दोन दिवसांच्या आत गुणपत्रके देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणाचेही शैक्षणिक अथवा नोकरीसंदर्भात नुकसान झाले नसल्याचा दावा ना. तावडे यांनी यावेळी केला. कोकण विद्यापीठाची मागणी जोर धरत आहे. यावर बोलताना त्यांनी प्रथम त्यांना मुंबई विद्यापीठ सोडून कोकण विद्यापीठ हवे का? हे पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

रत्नागिरीतील तंत्रनिकेतन राहणार आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये पदवी देण्याचा प्रयत्न होता. परंतु, काही प्राध्यापकांना पदवी कॉलेज झाल्यानंतर बदली होण्याची भीती होती. अशा प्राध्यापकांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी साथ देऊन गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान केले असल्याचेही ना. तावडे यावेळी म्हणाले.