Sat, Jul 20, 2019 13:37होमपेज › Konkan › रातोरात खड्ड्यांची झाली केवळ मलमपट्टी; अधिकार्‍यांना भल्या पहाटे करावे लागले मंत्र्यांचे स्वागत

मंत्री येणार नाहीत या भ्रमात उडाली झोप!

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:26PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे आणि चौपदरीकरण कामाची पहानी 8 दिवसांपूर्वी केली. त्यामुळे आता मंत्री महोदय पुन्हा येणार नाहीत, अशा भ्रमात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाची अचानक झोप उडाली. शुक्रवारी मंत्र्यांचा  अधिकृत दौरा जाहीर झाला आणि रातोरात खड्डे भरण्याचे काम सुरु झाले. मात्र, एका रात्रीत शहरातील खड्डे भरून झाले नाहीत. पुन्हा एकदा मलमपट्टीच करण्यात आली. मात्र, भल्या पहाटे प्रशासनाने ना. पाटील यांचे स्वागत केले.

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुन्हा एकदा महामार्गाची पहाणी केली. पहाटे साडेचार वाजता कोकणकन्या एक्स्प्रेसने त्यांचे चिपळूणमध्ये आगमन झाले. तहसीलदार जीवन देसाई यांनी पहाटे रेल्वे स्टेशन येथे ना. पाटील यांचे स्वागत केले. यावेळी बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर ना. पाटील चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले. यावेळी विश्रांतीनंतर ते सकाळी 7 वाजता महामार्ग पाहणीसाठी संगमेश्वरच्या दिशेने निघाले. त्या आधी प्रांताधिकारी कल्पना जगताप भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री येणार म्हणून  येथील महसूल, पोलिस आणि बांधकाम विभाग यंत्रणेला पहाटेपासून जागून काढावी लागली.

दरम्यान, मंत्री पुन्हा येणार नाहीत, या भरवशावर असलेला राष्ट्रीय महामार्ग विभाग शुक्रवारी अधिकृत दौरा आल्यावर खडबडून जागा झाला. आणि 5 सप्टेंबर खड्डे भरण्याची मुदत असताना शुक्रवारी रात्रभर खड्डे भरण्याचे काम सुरु केले. शहरातील महामार्गावरील रातोरात खड्डे भरण्यात येत होते. मात्र, मंत्री आले तरी हे काम पूर्ण झाले नाही. महामार्गावरील कामथे घाटात अजूनही खड्डे आहेत. शिवाय मोठमोठ्या खड्ड्यांवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला. पण, अजूनही खड्डे मुक्ती झाली नाही. सलग दोनवेळा मंत्र्यांचा दौरा झाला तरी संबंधित यंत्रणा हे काम करू शकली नाही. ना. पाटील यांनी खेरशेतपर्यंत महामार्गाची पाहणी केली. त्या नंतर ते पुढच्या ठिकाणी मार्गस्थ झाले आणि चिपळूणच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी  सुटकेचा नि:श्वास टाकला. यावेळी पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ आणि कर्मचारी उपस्थित होते.

भाजप पदाधिकार्‍यांना दौर्‍याचा विसर ?

राज्याचे महसूल आणि बांधकाम मंत्री व भाजपाचे नेते ना. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा महामार्गाच्या पहाणीसाठी चिपळूण दौर्‍यावर आले. भल्या पहाटे ते चिपळूण रेल्वे स्थानकावरउतरले. त्यांचे प्रशासनाने स्वागत केले. मात्र, भाजपा पदाधिकारी आपल्या नेत्यांना विसरले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यापैकी कोणीही यावेळी उपस्थित राहिले नाही. शासकीय विश्रागृह येथेही भाजप कार्यकर्त्यांचा पत्ता नव्हता. केवळ शहराध्यक्ष वैशाली निमकर या एकमेव स्वागतासाठी हजर होत्या. त्यामुळे भाजप पदाधिकारी मंत्र्यांचा दौरा विसरले की काय, अशी चर्चा सुरु होती.