Mon, Jun 17, 2019 04:47होमपेज › Konkan › सर्वाधिक खड्डेमय महामार्गाची ना. पाटील करणार पाहणी

सर्वाधिक खड्डेमय महामार्गाची ना. पाटील करणार पाहणी

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:39PMअलिबाग :  

राज्यामध्ये सर्वाधिक खड्डेमय महामार्ग अशी ओळख असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. पनवेल-पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग असा त्यांचा 500 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. खड्डे अनुभविण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचा हा दौरा निश्‍चित झाला. 

सार्वजनिक बांधकाम तथा महसूल आणि कृषी या महत्त्वाच्या हेवीवेट खात्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते कोल्हापूर असा प्रवास करणार आहेत. यापूर्वी त्यांनी पावसाळा संपताच महाराष्ट्र खड्डेमुक्‍त करू, अशी घोषणा केली होती. यावर जोरदार टीकाही झाली होती. मागील वर्षी आम्ही खड्ड्यांचे प्रहार सहन केले. आणि महाराष्ट्र खड्डेमुक्‍तही केला होता. यावर्षी पाऊस झाल्यामुळे खड्डेही जास्त पडले, असे सांगताना खड्डेमुक्‍तीचे अश्‍वासन ही दिले होते. मात्र, जोरदार टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार होते.  मात्र, आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना त्यांनी पाहणीचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सकाळी 6.15 मिनिटांनी शासकीय वाहनाने दौरा सुरू करतील. सुरुवातीला सायन येथे, 6.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत सायन-पनवेल महामार्गाची पहाणी करतील, त्यानंतर 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह पनवेल येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल-इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाची पहाणी करतील. त्यानंतर 11 वाजता माणगाव येथील शासकीय गृहात आगमन झाल्यावर महसूल आणि बांधकाच्या अधिकार्‍यांसमवेत मुंबई महामार्गाच्या माणगाव ते चिपळूण रस्त्याची पहाणी करतील. 

1 वाजून 30 मिनिटांनी शासकीय विसांग चिपळूण येथे आगमन, 2 वाजता चिपळूण ते लांजा राष्ट्रीय महामार्गाची पहाणी, 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह लांजा येथे आगमन त्यानंतर अधिकार्‍यांसमवेत लांजा-झाराप या महामार्गाची पहाणी, 8.30 वाजता सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात अगमन, 9.30 वाजता सावंतवाडी ते कोल्हापूर प्रयाण करणार आहेत. या दौ-यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, आमदार उपस्तित राहणार आहेत. 

दौर्‍याला वायप्लस दर्जाची सुरक्षा
सध्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठे खड्डे पडले असून लोकांचा तीव्र संताप पहावयास मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्र्यांच्या या दौ-याला वायप्लस दौ-याची सुरक्षा मंजूर करण्यात आली आहे. तसेच मंत्र्याच्या दौर्‍याच्यावेळी योग्य ती सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्व पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.