Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Konkan › खड्ड्यांचे दर्शन झाल्याने बांधकाममंत्री संतप्त

खड्ड्यांचे दर्शन झाल्याने बांधकाममंत्री संतप्त

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:22PMसावंतवाडी ः प्रतिनिधी    
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सावंतवाडीत सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी  जिल्ह्यातील  रस्ते दुरुस्तीची कामे कूर्म गतीने होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केली. महाराष्ट्र खड्डेमुक्‍त झाल्याची घोषणा बांधकाममंत्र्यांनी केल्यानंतरही त्यांना सिंधुदुर्गात खड्ड्यांचे दर्शन झाल्याने अधिकार्‍यांसमोर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केल्याचेही सांगण्यात येते.

ना. पाटील हे शुक्रवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. आ. वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आदी पदाधिकारी उपस्थित  होते. तत्पूर्वी, नगराध्यक्ष प्रेमानंद  साळगावकर यांनी ना. चंद्रकांत पाटील याची भेट घेऊन  सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांना निधी देण्याची मागणी करणारे लेखी निवेदन सादर केले. जागा संपादन करण्यासाठी येणार्‍या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने चौपदरीऐवजी तीन पदरी रस्ते तयार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी 30 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातून आगामी तीन वषार्ंच्या काळात 10 हजार कि.मी. चे तीन पदरी महामार्ग तयार केले जाणार  असल्याची ना.चंद्रकात पाटील यांनी  दिली.
 सार्वजनिक बांधकाम  कार्यालयात जिल्ह्यातील अधिकार्‍यांसोबत ना. पाटील आढावा बैठक घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, काही राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. याशिवाय भारतमाला योजनेतून  राज्यात 6500 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले. हे महामार्ग सहापदरी असून पूर्णपणे काँक्रिटचे असणार आहेत.  पुढील तीन वषार्ंत 38 हजार किलोमीटरचे महामार्ग तयार होणार आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्‍वास ना.पाटील यांनी व्यक्‍त केला. राज्यातील 57 हजार किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यावर चांगल्या प्रकारे मजबुतीकरण केल्याने खड्डे पुन्हा उखडणार नाहीत. 

 राज्यात ग्रामीण रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. त्यामुळे हा प्रश्‍न देखील सुटून राज्याचे चित्र बदलेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.   

 अभियंत्यांसमेवत घेतलेल्या बैठकीत त्यांनी  जिल्ह्यात होत असलेल्या रस्ते दुरूस्ती कामाची माहिती घेतली.  या बैठकीत त्यांनी रस्ते दुरूस्तीत होत असलेल्या  दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्‍त केली. रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची सूचनाही त्यांनी केली.