Thu, Dec 12, 2019 08:41होमपेज › Konkan › चंदन तस्करीची पाळेमुळे गोवा-काणकोणपर्यंत 

चंदन तस्करीची पाळेमुळे गोवा-काणकोणपर्यंत 

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:11PMकुडाळ : प्रतिनिधी

वेंगुर्ले-मठ येथे वनविभागाने टाकलेल्या धाडीत चंदनासह जीवंत कासव व कासवाचे अवशेष व सात संशयीतांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच या रॅकेटचे गोव्यापर्यंत कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग वन विभागाच्या पथकाने सोमवारी गोवा-कानकोन येथील एका बंद कंपनीवर छापा टाकला व तेथील चंदनाचा साठा ताब्यात घेतला. पथकाने कंपनीतील इलेक्ट्रीक वजनकाटा, केबल, चंदन भरण्यासाठी वापरात असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या, मोटरसायकल व इतर कागदपत्रे मिळुन 32 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त करत वॉचमन शंकराआप्पा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला कुडाळ न्यायालयासमोर सोमवारी हजर केले असता, न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

सिंधुदुर्ग वनविभागाने वेंगुर्लाकॅम्प मध्ये टाकलेल्या छाप्यात चंदन व जीवंत कासवाचे अवशेष आढळुन आले होते. तसेच सात जणांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. हे चंदन मठ येथील शासकीय वनातील असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले होते. संशयीतांनी या चंदनाची विक्री व वाहतूक केल्याने सात संशयीतांना पोलिस कोठडीची न्यायालयाने शिक्षा दिली होती. या संशयीतामधिल अजित गणपत गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोवा येथील परप्युमर्स मोखर्द श्री स्थळ कानकोन येथील बंद कंपनीवर छापा टाकला असता या कंपनीत मोठ्या  प्रमाणात चंदनाचा साठा करून ते चंदन प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून बाहेर पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून इलेक्ट्रिक वजन काट्याची केबल-1000 रू., चंदन भरण्यासाठी वापरत असलेल्या 210 प्लॉस्टिक पिशव्या-2100 रू. चंदन वाहतुक प्रकरणी वापरलेली मोटरसायकल 30हजार रू. व इतर कागदपत्रे मिळुन 32,200 रू.चा मुद्देमाल जप्त केला. यावेळी शंकराआप्पा नामक वॉचमनला चौकशीसाठी ताब्यात घेतले.कारवाई सुरू असतानाच अब्दुल करीम नावाचा इसम 7.300 किलो चंदन कंपनीत विकण्यास आला असता त्याला पकडुन त्याच्या विरोधात गोवा येथील स्थानिक वनक्षेत्रपाल कानकोन यांनी स्वतंत्र गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. ही कारवाई पूर्ण होत असतानाच कंपनीचे मालक जुबेर जुबी यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी वरून कुडाळ वनक्षेत्रपाल पी.जी. कोकीतकर यांना 1 लाख रूपयाच्या लाचेचे आमिष दाखवत हे प्रकरण मिटवून टाका व चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या वॉचमन शंकराआप्पा याला सोडुन देण्याची विनंती केली.

तसेच 1 लाख रूपयापैकी 50हजार रूपये घेवून राघवेंद्र या व्यक्‍तीस पाठविले. वनक्षेत्रपाल कुडाळ यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना त्या कर्तव्यापासुन परावृत्त करण्याचा मालक जुबेर जुबी यांनी प्रयत्न केल्याने कुडाळ वनक्षेत्रपाल यांनी त्वरीत गोवा राज्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागास याबाबत माहिती देवून 50 हजार रूपये देत असताना राघवेंद्र याला रंगेहात पकडुन दिले याबाबत गोव्यात संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा येथील बंद कंपनीत टाकलेल्या धाडीत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या शंकराआप्पा याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  

या कारवाईत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, कुडाळ वनक्षेत्रपाल पी.जी. कोकीतकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता. याबाबतचा अधिक तपास कुडाळ वनक्षेत्रपाल पी.जी.कोकीतकर करत आहेत.