Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना 13 कोटी खावटी कर्जमाफी मिळण्याची शक्यता

शेतकर्‍यांना 13 कोटी खावटी कर्जमाफी मिळण्याची शक्यता

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 10:07PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता कर्जाची नियमित परतफेड करते. त्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये शेतीपूरक खावटी कर्जाचा सामावेश करण्याचा निश्‍चितच प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या खास बैठकीत दिली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना 13 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना 2017 च्या कर्जमाफी योजनेमध्ये अल्प मुदत शेतीपूरक खावटी कर्जाचा सामावेश करावा यासाठी खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बॅक संचालक अतुल काळसेकर, अविनाश माणगावकर, व्हिक्टर डॉन्टस, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, बँक व्यवस्थापक प्रमोद गावडे, कृष्णा चव्हाण, शरद सावंत आदी शिष्टमंडळाने गुरूवारी दुपारी 12 वाजता मुंबई येथील वर्षा बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळास सिंधुदुर्ग जिल्हयातील वंचीत शेतकर्‍यांचा कर्जमाफी योजनेमध्ये निश्‍चितच सामावेश करुन त्यांना लाभ मिळवून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांबाबत फोनद्वारे माहिती दिली. याबाबत योग्य तो निर्णय त्वरित घेवून, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँकेच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. नाबार्डने बँकेस ‘अ’ वर्ग दिला असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर वाढण्यासाठी नेहमीच मदत करत आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली रक्‍कम अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत असल्याने संपूर्ण कर्जमाफीचा लाभ अल्प शेतकर्‍यांनाच मिळाला. परिणामी नियमित कर्ज परतफेड करणारा प्रामाणिक शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहिला. जिल्हा बँकेशी संलग्‍न विकास संस्थेमार्फत शेतकर्‍यांना ज्यांचे क्षेत्रातील सहहिस्सेदारांची संमती मिळत नाही, तसेच ज्यांचे स्वत:चे नावे क्षेत्र शेतकर्‍यांना शेतीकर्ज उपलब्ध होत नाही, अशा शेतकर्‍यांना शेती पुरक खावटी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे शेतीस पूरक असा व्यवसाय करण्यासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन, शेतमांगर, दुग्धव्यवसाय, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, सिंचन इत्यादी मध्यम मुदत स्वरूपाच्या शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या कर्जाचा सामावेश कर्जमाफी योजनेत करण्यात यावा अशी मागणी सतीश सावंत यांनी यावेळी केली. तसेच शासकीय ठेवी जिल्हा बँकेत ठेवण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता, त्यांनी याबाबत सहमती दर्शविली. असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली.