Tue, Mar 19, 2019 05:09



होमपेज › Konkan › सोनवडे घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील : वैभव नाईक 

सोनवडे घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील : वैभव नाईक 

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:07PM



कणकवली : प्रतिनिधी

कोल्हापूर आणि कोकण जोडणार्‍या सोनवडे घाटमार्गाची अलिकडेच केंद्रीय पर्यावरण खात्याच्या तज्ञांनी पाहणी केली होती. पाहणीनंतर या घाटासंबंधी अलिकडेच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या घाटमार्गाला पर्यावरण खात्याचा अंतिम दाखला देण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीने सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच हा दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त होणार आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सोनवडे घाटमार्गाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली. 

गतवर्षी केंद्रीय वन आणि वन्यजीव विभागाने सोनवडे घाटमार्गाच्या वनेत्तर कामाला तत्वता मान्यता देताना 35 अटी घातल्या होत्या. त्यामध्ये वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी कोणत्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत, हवा, पाणी, आवाज, प्रदूषण होणार नाही याची दक्षता त्याचबरोबर केंद्रीय पर्यावरण खात्याचा दाखला या घाटमार्गाला मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवाज, हवा आणि पाण्याचे प्रदुषण होणार नाही यासाठी काही सॅम्पलही घेतले होते. तसेच इतर बाबींचीही पूर्तता केली होती. तर केंद्रीय पर्यावरण खात्याचा दाखला मिळावा या करिता खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक हे सातत्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होते. 

त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि अलिकडेच केंद्रीय पर्यावरण खात्याची सहा जणांची तज्ञांची टीम सोनवडे घाटमार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आली होती. या समितीची दिल्लीत त्यानंतर बैठक झाली. या बैठकीत या घाटमार्गाला पर्यावरण खात्याचा ‘ना हरकत दाखला’ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा दाखला सा. बां. विभागाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे सोनवडे घाटमार्गाच्या कामाला गती मिळेल, असा विश्‍वास आ. वैभव  नाईक यांनी व्यक्त केला. 

याबाबत सा. बां. विभागाचे सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता श्री. बच्चे यांच्याशी संपर्क साधला असता, सोनवडे घाटमार्गाच्या अलायमेंटला सा. बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिली आहे. आम्ही अंतिम अंदाजपत्रक करण्यास घेतले आहे, असे सांगितले. तर कोल्हापूर विभागाचे उपअभियंता श्री. इंगवले यांनीही केंद्रीय पर्यावरण खात्याच्या समितीने पर्यावरणाचा ना हरकत दाखला देण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.