Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Konkan › लेप्टोस्पायरोसीस तापाबाबत घ्यावयाची खबरदारी

लेप्टोस्पायरोसीस तापाबाबत घ्यावयाची खबरदारी

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:22PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी :

लेप्टोस्पायरोसीसबाबत जिल्हा आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गावागावात जावून घरोघरी पत्रके, भिंतीपत्रके लावून लेप्टोस्पायरोसीस संदर्भात करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी ताप आल्यास तो अंगावर काढता तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रामुख्याने भातकापणीच्या हंगामात  लेप्टोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. आता भातकापणीचा हंगाम संपला असला असून लेप्टोच्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. तरीही नागरिकांच्या माहितीसाठी लेप्टोबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागामार्फत घर टू घर पोहचविल्या जात आहेत.

लेप्टोस्पायरोसीस सदृश्य तापाबाबत जिल्ह्यातील जनतेने घ्यावयाची खबरदारी म्हणून पुढील सूचनांचे पालन करावे-आपले घरात अगर शेजारी तीव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, तीव्र स्नायुवेदना, लघवी पिवळी होणे अशा लक्षणांचा रुग्ण असल्यास त्याला त्वरीत नजीकच्या प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करावे. बर्‍याचवेळा रुग्णांची लक्षणे ही किरकोळ स्वरुपाची व न समजून येणारी असतात.

त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर काढू नये. या रोगाचा प्रसार बाधित प्राणी (मुख्यत्वे उंदीर, घुशी, डुकर, गाई, म्हशी, मांजर, कुत्री) यांच्या लघवीवाटे लेप्टोस्पायरोसीसचे जंतू बाहेर पडत असतात. बाहेर पडलेले जंतू पाण्यात मिसळल्याने  पाणी दूषित होते व त्या पाण्याचा संपर्क माणसाच्या त्वचेशी आल्यास या रोगाचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे पायावर व हातावर जखमा असणार्‍या व्यक्‍तींनी अशा पाण्याशी संपर्क टाळावा. या रोगाचे निदान रक्‍त व लघवी याची तपासणी करुन करता येते.

जिल्ह्यातील संशयित तापाच्या रुग्णांच्या रक्‍ताची व लघवीची तपासणी करुन निदान करण्याची सोय जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध आहे. तसेच आवश्यकतेनुसार ज्या रुग्णास संदर्भित करावयाचे असल्यास जीएमसी गोवा व सीपीआर कोल्हापूर येथे दरवर्षी 1 जुलै ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात येते.जिल्ह्यातील सर्व जनतेने याबाबत सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग, जि.प.सिंधुदुर्ग यांनी केले आहे.           

- मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी,सिंधुदुर्ग

दूषित माती,दूषित पाण्याशी संपर्क नको

ज्या व्यक्‍तींच्या हाता पायांवर जखम किंवा खरचटलेले असल्यास अशा व्यक्‍तींनी दूषित पाणी, दूषित माती  तसेच साचलेले पाणी यांचेशी संपर्क टाळावा. दूषित पाणी अगर माती यांचेशी संपर्क टाळणे शक्य नसल्यास रबरी बूट व हातमौजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. भात शेतीच्या हंगामात काम करणार्‍या व्यक्‍तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे. शेतात भात कापणी करणार्‍या व्यक्‍तींनी शक्य असल्यास हातमौजे व रबरी बूट वापरावे. पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा यांच्याशी जवळीकता टाळावी. घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ राखावा. उंदीर, घुशी यांचा नायनाट करावा. लेप्टोस्पायरोसीसची  लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेशी व गावातील आरोग्य कर्मचार्‍याशी  संपर्क साधावा. सर्व ताप रुग्णांनी त्यांना देण्यात येणारा औषधोपचार नियमित व वेळेवर (डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे) सेवन  करावा.