Mon, May 20, 2019 20:17होमपेज › Konkan › ओले काजूगर ठरताहेत रोजगाराचे हंगामी साधन!

ओले काजूगर ठरताहेत रोजगाराचे हंगामी साधन!

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शुध्द, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी काजू, फणस, आंबा, कोकम, करवंद, जांभूळ, ओले काजूगर असा कोकणातील रानमेवा चैत्र महिन्यापासून सुरु होतो. तो आषाढ मासापर्यंत रुची भागवण्यासाठी उपलब्ध असतो. या डोंगराळ फळांचा बहर हे चैत्रपालवीची हमखास नैसर्गिक देणं आहे. सध्या बाजारात ओल्या काजुगरांची आवक वाढली असून, ग्रामीण भागातील महिला हे ओले काजूगर दुर्गम, डोंगराळ भागातून आणि जंगलातून शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.

ओल्या काजूगरांची रोजची मागणी वाढत आहे. त्यामुळे विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोकणच्या भूमीवर काजूच्या झाडांची विपुलता आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून  या झाडांवर काजूच्या बिया  तोडून ग्रामीण भागातील महिला बाजारात विक्री करण्यासाठी शहरात घेवून येत असतात. काजूच्या बियांच्या हंगामाची नुकतीच सुरुवात झाली असल्याने त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांचा भाव मात्र चढता आहे. काजूच्या बियांना चढा भाव असला तरीही खवय्ये मात्र काजू बियांचा आस्वाद आवडीने घेत असतात. या काजूगरांची मागणी हॉटेल व्यावसायिकसुध्दा मोठ्या प्रमाणात करत असतात. मात्र, या महिलांचा रोख सकाळ आणि सायंकाळच्या बाजारावरच असतो. 

दररोज शंभरहून अधिक महिला छोट्या टोपल्यात काजूगर घेऊन मुख्य बाजारपेठेत  रस्त्याच्या कडेला बसतात. त्यानंतर धारदार विळ्याने बिया कापून त्यातील अर्धे-अर्धे ओले काजूगर करुन त्यातून काजूच्या बियांचे  किमान 25 ते 30 नग याप्रमाणे हिरव्या पानावर काजूगराचा वाटा मांडून विक्रीसाठी ठेवतात. पन्नास रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत या वाट्यांची किंमत असते. दिवसाकाठी या ओल्या काजूगर विक्रीतून  सुमारे 800 ते 1 हजार रुपयांची कमाई होते. अशाप्रकारे तीन ते चार महिन्यांसाठी ओल्या काजूगरातून चांगली आर्थिक कमाई होत असते. ओल्या काजू बीमधून गर बाहेर काढणे हे खूप त्रासदायक काम आहे. 

ओले काजूगर काढताना हातांना जो चिक लागतो त्याने हाताला डाग पडतात. या कामामध्ये मोठी मेहनत असल्याने ओल्या काजूगरांचा दरही चढा असतो. यावर्षीही काजू पिक चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काजूगराचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने ओल्या काजूची चव चाखण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.