Sun, Mar 24, 2019 12:40होमपेज › Konkan › गर्दीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीला

गर्दीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीला

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 9:00PMखेड : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या काही दिवसांतच शाळा सुरू होणार असून या पार्श्‍वभूमीवर बच्चेकंपनीसह गावाला आलेल्या चाकरमान्यांनी रविवारपासून परतीची वाट धरली आहे. त्यामुळे महामार्गासह कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल आहेत. गर्दीमुळे परतीचा प्रवास नको झाला आहे.

काही चाकरमान्यांनी खासगी वाहनांचा आधार घेत मुंबई गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनानेदेखील दि.4 एप्रिलपासून हॉलिडे स्पेशल गाड्या सोडून चाकरमान्यांसह पर्यटकांनादेखील दिलासा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार्‍या हॉलिडे स्पेशलमुळे नित्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिल्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. या हॉलिडे स्पेशल गाड्या 10 जूनपर्यंत धावणार असल्याने चाकरमान्यांची चिंता दूर झाली असून चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रविवारपासून बहुतांश चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले असून, कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमीत गाड्यांसह हॉलिडे स्पेशल गाड्या गर्दीने धावत आहेत.

रेल्वेकडून जादा फेर्‍या

कोकण रेल्वे मार्गावरून दि. 8 जून : एलटीटी - करमाळी, दि. 9 जून : एलटीटी - करमाळी, दि. 10 जून : एलटीटी - करमाळी तसेच सीएसटी -कोचिवली या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.