होमपेज › Konkan › मालवाहू ट्रक लुटणारी गोध्रा येथील ‘ताडपत्री टोळी’!

मालवाहू ट्रक लुटणारी गोध्रा येथील ‘ताडपत्री टोळी’!

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:19PMओरोस : प्रतिनिधी

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून साहित्य चोरणार्‍या रॅकेटचा पर्दापाश करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. गुजराथ-गोध्रा येथील  ‘ताडपत्री गँग’ म्हणून प्रसिध्द असलेल्या गँगचे हे कृत्य असून  या रॅकेटमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी (37) व त्याचे साथीदार सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कठडी या दोघांच्याही मुसक्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने आवळत्या आहेत. या रॅकेटमध्ये असलेला व माल विक्री करणार्‍या दलालांचाही तपास लागला असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   ते म्हणाले, उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री कापून आतील साहित्य चोरणारी टोळी राज्यभरात कार्यरत होती. 1 एप्रिल रोजी सिंधुदुर्गातही अशी चोरी झाली होती. याचा तपास सुरू होता. कुडाळ राज हॉटेल व तळेरे पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकमधील ताडपत्री फाडून आतील खसखस, इलेक्ट्रीक सामान व फ्रोझन, हॅण्डवॉश असा 7 लाख 73 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या चोरीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय होता. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास केला असता दोन्ही गुन्ह्याची पध्दत एकच असल्याचे दिसून आले. राज्यात अन्यत्र झालेल्या अशाच प्रकारच्या चोर्‍यांमध्येसुद्धा हिच मोडस् ऑपरेशन वापरली होती.  गुजराथ राज्यातील गोध्रा येथील ‘ताडपत्री गँग’ अशा प्रकारच्या चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  या दृष्टीने तपास केला असता या चोर्‍यांचा पर्दापाश झाल्याचे श्री. दीक्षित म्हणाले. 

चोरट्यानी या चोरीसाठी एक ट्रक व एक क्रेटा कार वापरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जीए 35 बी 5979 क्रमांकाची क्रेटा गाडी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजराथमधून ताब्यात घेतली आहे. तसेच ताडपत्री गँगमधील मुस्ताक अब्दुल भागलीया उर्फ फटाका (37) व साथीदार सुलेमान उर्फ सुलीया अब्दुलगणी कठडी या दोघांनाही गोध्रा येथून  ताब्यात घेण्यात आले. चोरीतील माल नंदुरबार जिल्ह्यातील अक्‍कलकुवा येथील व्यापारी विनोद भगवान दास व निया उर्फ वाणी यांना विकण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार या रॅकेटमध्ये अजुन कितीजण आहेत व दलाली करणारे कितीजण आहेत याचा तपास सुरू आहे. संशयितांनी 1 लाख 73 हजार 930 रूपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून दिल्या आहेत. दोन्ही संशयितांकडून गाडी आणि ट्रक (जी.जे. 16 डब्लू 4379) सह 23 लाख 73 हजार 930 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषनचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, संतोष सावंत, अनुपकुमार खंडे, कृष्णा केसरकर, सत्या पाटील, प्रथमेश गावडे, प्रशांत कासार यांनी कामगिरी बजावली.

Tags : Konkan, Cargo, truck, looter