Sat, Dec 14, 2019 02:59होमपेज › Konkan › कार-स्कूटर अपघात; कासार्डेचा तरुण ठार

कार-स्कूटर अपघात; कासार्डेचा तरुण ठार

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 25 2019 11:46PM
नांदगाव : वार्ताहर 

मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे-जांभूळवाडी येथे स्कोडा  कार व अ‍ॅक्टिवा दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार संदीप सोमाजी पाताडे  (वय 36, रा. कासार्डे दक्षिण गावठाण) हा जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या परिसरात महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर  झालेला हा पहिलाच भीषण अपघात आहे. 

संदीप पाताडे हे कणकवली येथे काही कामानिमित्त होंडा अ‍ॅक्टीवा दुचाकी  घेऊन गेले होते. काम आटपून ते कासार्डे दक्षिण गावठण येथे घरी परत येत होते. तर स्कोडा कार चालक व तळेरे येथील दंतचिकीत्सक न डॉ. प्रवीणकुमार नारायण शेट्टी (रा. कणकवली) हे कणकवलीकडे जात होते. कासार्डे-जांभूळवाडी येथे महामार्गावर रुक्मिणी मंगल कार्यालयानजीक ही वाहने आली असता या दोन वाहनांत भीषण अपघात घडला. 

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दुचाकी विरूध्द दिशेला फरफटत दहा फुट लांब रस्त्यावर पडली तर स्वार श्री. पाताडे हे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव झाल्याने दुचाकी स्वार संदीप पाताडे जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकीच्या पुढील भागाचा  अक्षरशः चुराडा झाला. तर स्कोडा कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.अपघातानंतर स्कोडा कार विरूध्द दिशेला फिरली होती. पाऊस सुरू असल्याने मदतकार्य करण्यात अडथळा निर्माण होत वाहतूक कोंडी निर्माण झाली.

नेहमी हसतमुख स्वभाव व मेहनती असणारा संदीप हा पूर्वी कसाल बसस्थानकावर रसवंती गृहात काम करायचा. दोन वर्षापूर्वी त्यांनी कासार्डे तिठ्यावर स्वःताचा ऊसाच्या रसाचा गाडी चालू केली होती. यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शालेय जीवनापासून गरीबीत दिवस काढलेल्या संदीपची आयुष्याची गाडी कुठेतरी रुळावर येत असताना  त्याचा  अकाली अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 

 घटनास्थळी भाऊ शेटये व  स्थनिकासह जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, हवालदार बसत्याव पिंटो, प्रसाद नाईक, पोलीस नाईक प्रकाश गवस, चालक विष्णू सावळ यांनी तात्काळ घटनास्थळी मदतकार्य करीत कणकवली पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविला व  महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. संदीपच्या पश्‍चात त्याची आई,पत्नी,तीन वर्षाची मुलगी, बहीण, काका व परीवार आहे.  उतार वयात आईचा आधार गेल्याने व तीन वर्षाच्या मुलगी पोरकी झाल्याने पाताडे कुटुंबियांवर  शोककळा पसरली आहे.