Sat, Jun 06, 2020 07:50होमपेज › Konkan › घोडे मैदान लांब तरी संपर्क अभियान सुरु

घोडे मैदान लांब तरी संपर्क अभियान सुरु

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 9:07PMआरवली : जाकीर शेकासन

विधानसभा निवडणुकीला अजून सव्वा वर्ष शिल्लक असताना चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण असतील, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. घोडेमैदान अजून लांब असले तरी इच्छुकांनी आतापासून संपर्क अभियान सुरु केले आहे. शिवसेनेत आतापासून उमेदवार कोण असेल? चिपळूणचा असेल की, संगमेश्‍वर तालुक्यातील असेल याची चर्चा सुरु आहे.

शिवसेनेचे विद्यमान आ. सदानंद चव्हाण यांनीच निवडणूक लढवावी, अशी मतदार जनतेची मागणी असतानाच संगमेश्‍वर तालुक्याला संधी मिळावी यासाठी माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले असले तरी आ. सदानंद चव्हाण यांनी केलेली विकासकामे, त्यांचा असणारा जनसंपर्क या जोरावर सदानंद चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्‍चित आहे. राष्ट्रवादीकडून शेखर निकम तर भाजपकडून कोण, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र, निवडणूक तिरंगी आणि अटीतटीची होणार हे तेवढेच खरे आहे.

मतदारसंघाची फेररचना

2009 ला राज्यात विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली. यात संगमेश्‍वर तालुक्याचे तीन भाग झाले. साखरपा परिसर राजापूरला तर नावडी (संगमेश्‍वर) परिसर रत्नागिरी मतदारसंघात विलीन झाला. संगमेश्‍वर तालुक्याचा सर्वाधिक भाग चिपळूण मतदारसंघात विलीन झाला. फेररचनेनंतर शिवसेनेकडून पहिल्यांदाच येथून चिपळूणचे तत्कालीन तालुकाप्रमुख सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी संगमेश्‍वरमधून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उद्योगपती श्रीधर जाधव इच्छुक होते. त्यावेळी पुढची टर्म संगमेश्‍वरला असा अलिखित करार होऊन  उमेदवारी निश्‍चित झाली. 

संगमेश्‍वरला उमेदवारीचा आग्रह

2014 ला राज्यात सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. यामुळे ऐनवेळी धोका नको म्हणून विद्यमान आमदारांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली. या कारणाने सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाले. गेल्या 10 वर्षांत या मतदारसंघात शिवसेना फोफावली. आगामी निवडणुकीनंतर मतदारसंघांची पुन्हा फेररचना होणार आहे त्यामुळे 2019 ला चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघातून संगमेश्‍वरचाच उमेदवार मिळावा, यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेना रिस्क घेणार का?

2019 ला चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघातून संगमेश्‍वरचाच उमेदवार मिळावा म्हणून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्या तरी शिवसेना यावेळी कोणतीही रिस्क घेण्यास तयार होणार नाही. अगोदर गमावलेली जागा 2009 मध्ये आ. सदानंद चव्हाण यांनी जिंकून शिवसेनेला दिलासा दिला. या नंतर सदानंद चव्हाण यांनी 2014 मध्येही विजय मिळविला. सतत दोनवेळा आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये आ. चव्हाण यांनी मतदारसंघात विकास कामांची गंगाच आणली. त्यांचा मतदारसंघात असणारा संपर्क, जनतेचा पाठिंबा लक्षात घेता सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना नेतृत्व चिपळूण मतदारसंघात जुगार खेळेल, असे वाटत नाही.

भाजपची तयारी

केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूणमधून तयारीनिशी उतरण्याचा मनसुबा आखला आहे. भाजपकडून अनेक नेते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये स्वतः जिल्हाध्यक्ष बाळ माने, तुषार खेतल, सूर्यकांत साळुंखे, अनिल घोसाळकर, गणेश चाचे यांसारख्या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. यावेळी भाजप निवडणुकीच्या रिंगणात धनाढ्य आणि बलाढ्य उमेदवार उतरुन विरोधकांची झोप उडवेल, असे बोलले जात आहे. यासाठी भाजपने मतदारसंघात संपर्क अभियान सुरु केले आहे.

...तर शिवसेनेला धोका

भाजपची निवडणुकीची तयारी पाहता जर चिपळूण मतदारसंघात शक्तीशाली उमेदवार दिला तर याचा धोका शिवसेनेला जरुर होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार परिपक्व नसल्याने भाजपची मते शिवसेनेच्या पारड्यात पडली होती. पण आगामी निवडणुकीत असे होणार नाही. या दृष्टीने कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. भाजप उमेदवाराने गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळविली तर याचा शिवसेना उमेदवाराला फटका बसेल, असा अंदाज आहे.

राष्ट्रवादीकडून शेखर निकमच

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे शेखर निकम यांनी शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. अवघ्या सहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीकडून अन्य कोणीही इच्छुक नसल्याने शेखर निकम हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे निश्‍चित आहे. शेखर निकम यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक गावात त्यांची ओळख आहे. पराभव झाला असला तरी तेव्हापासून आजतागायत त्यांनी पक्ष संघटनेचे काम अधिक मजबूत करुन कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. 

रमेश कदम निवडणूक लढवणार?

गत निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढविली. या निवडणुकीत काँग्रेसचे डिपॉझिटही जप्त झाले होते. पण, यावेळी काँग्रसकडे माजी आ. रमेश कदम यांच्यासारखे खमके नेतृत्व आहे. गेल्या पाच वर्षांत रमेश कदम यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांच्याकडे राजकीय अनुभवाचा अभाव नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी झाली नाही तर काँग्रेसकडून माजी आमदार रमेश कदम हे निवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे.