Tue, Apr 23, 2019 01:42होमपेज › Konkan › कॅन्सर हा रोग नव्हे तर विकृती

कॅन्सर हा रोग नव्हे तर विकृती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कॅन्सरला रोग म्हटले जाते. पण तो रोग नाही. माणसाच्या आचरणामध्ये जे अयोग्य बदल झाले आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कर्करोग ही एक विकृती आहे. सनातन धर्माच्या शिकवणीचे अनेक पुरावे विज्ञानानेही आता सिद्ध केले आहेत. म्हणून दैनंदिन शुद्ध आचरणाची शिकवण देणारा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.

मठ  (ता. लांजा) येथे  मुंबई-गोवा महामार्गावर लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराचे कलशारोहण शंकराचार्यांच्या हस्ते दि. 26 मार्च) झाले. त्यावेळी ते बोलत होते. धर्माचरणात सांगितलेल्या अनेक बाबी आजच्या विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की, मूल जन्माला आले की, त्याचे नामकरण केले जाते. तेव्हा सनातन वैदिक नामकर्मातील संस्कारांमध्ये बालकाला त्याचा जन्म पणजोबापासून झाल्याचे मंत्र ऐकविले जातात. आताच्या विज्ञानानेही जनुकांच्या साह्याने हेच सिद्ध केले आहे. पूर्वीच्या लोकांनी सनातन धर्म पाळला,  त्यातून त्यांना आनंद मिळाला. आजही तो धर्म पाळला तर आपल्यालाही समाधान होईल. परिपूर्ण धर्मामध्ये ‘इदं न मम’ अशी समर्पणाची भावना सांगितली आहे. ती निर्माण होण्यासाठी आणि पापक्षालनासाठी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा, नवी मंदिरे बांधावीत, असे सांगितले आहे.

मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरीही रांगांमुळे पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही तरी कळसाचे दर्शन घेऊन परतात. कारण गाभार्‍यातील देवतेचे अधिष्ठान कळसामध्ये निर्माण केलेले असते. सगुण मूर्तीच्या दर्शनाचे फळ कळसाच्या दर्शनाने मिळते. कळस म्हणजे निर्गुणस्वरूप तर गाभार्‍यातील अवयवांनी बद्ध असलेली मूर्ती म्हणजे सगुण रूप असते. कोणत्याही मंदिराचा कळस एकाच प्रकारचा शंकूच्या आकाराचा असतो. अवकाशातील सत्त्वगुण कळसाच्या बिंदूमधून खेचला जाऊन तो गाभार्‍यातील मूर्तीपर्यंत पोहोचतो. तेथे दर्शन घेणार्‍यांना तोच सत्त्वगुण दिला जातो, असे सांगून शंकराचार्यांनी सत्त्व, रज आणि तमो गुणांविषयी शंकराचार्यांनी ऊहापोह केला. हिंदू विवाह संस्थेमध्येही धर्माच्या परिपूर्णतेचे दर्शन घडते. धर्माचरण करताना धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ आपल्या संमतीनेच आचरण्याचे वचन वराकडून वधू घेते. पत्नीला किती महत्त्व आहे, हेही त्यातून सिद्ध होते. ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराजासारख्या संतांनीही पतिव्रता महिलांची महती सांगितली आहे. असे धर्माचरण सांगणार्‍या भारतीय संस्कृतीवर इतकी आक्रमणे झाली, तरी संस्कृती आहे आजही जपली गेली आहे. त्यामुळेच ती श्रेष्ठ आहे, असेही शंकराचार्यांनी सांगितले.

कलशारोहणापूर्वी कलशाची मिरवणूक काढण्यात आली. शंकराचार्यांनी स्वतः मंदिरावर जाऊन कलशाची स्थापना केली. दरम्यान, नव्या मंदिराच्या प्रांगणातील सहावा आणि संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव सुरू झाला असून तो 31 मार्चपर्यंत चालणार आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या असे कार्यक्रम पार पडणार आहेत. रोज रात्री नऊ ते 12 या वेळेत कीर्तने होणार आहेत.

Tags : 


  •