Fri, Apr 26, 2019 15:55होमपेज › Konkan › ‘रिफायनरी‘ रद्द करा; ‘सीएम’ना सेनेचे साकडे 

‘रिफायनरी‘ रद्द करा; ‘सीएम’ना सेनेचे साकडे 

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:21PM

बुकमार्क करा

राजापूर  : प्रतिनिधी 

कोकणातील राजापूर तालुक्यात नाणार परिसरामध्ये प्रस्तावित शासनाचा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी अनुषंगाने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. 

नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पामध्ये 14  गावांमधील क्षेत्र बाधित होणार असून या प्रकल्पाला स्थानिक जनतेसह प्रकल्पग्रस्तांकडून तीव्र विरोध केला जात आहे. भूसंपादनासाठी प्रशासनाने जमीन मोजणीचे काम हाती घेतले होते. परंतु, लोकांचा विरोध पाहून प्रशासनाने मोजणी थांबवली. तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर प्रकल्पविरोधी समितीने धरणे आंदोलन छेडले होते. तसेच ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकी

मध्ये हा प्रकल्प रद्द होण्यासाठी हिवाळी अधिवेशनमध्ये लक्षवेधी मांडत आवाज उठणार, असे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे आ.राजन साळवींनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी दाखल केली.
स्थानिक जनतेच्या भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांचा  विरोध असल्याचे व प्रकल्पामुळे 13 हजार एकर जमीन संपादित होणार असून त्यामध्ये 14 गावे बाधित होणार असल्याचे सांगण्यात आले.

या भागामध्ये बहुसंख्य लोकांच्या आंबा- काजूच्या बागायती असून या बागायतीवर अनेक कामगार मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकल्पाच्या जागेंतर्गत अनेक घरे व कुटुंब येत असल्याने अनेक कुटुंब विस्थापित होण्याचा धोका संभवत असून गावाची वस्ती खाडीकिनारी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रदूषणाचा व मच्छीमारी करणार्‍या लोकांवरसुद्धा उपासमारीची वेळ येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मात्र गुलदस्त्यातच आहे. याप्रसंगी आ.उदय सामंत, आ.राजन साळवी, आ.सदानंद चव्हाण, आ.वैभव नाईक, आ.भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, आ.प्रताप सरनाईक, आ.अमित घोडा, आ.बालाजी किणीकर, आ.रुपेश म्हात्रे, आ.शांताराम मोरे,आ.सुभाष भोईर उपस्थित होते.