Fri, Aug 23, 2019 21:05होमपेज › Konkan › शिधापत्रिका आधार लिंकसाठी मोहीम राबवा : ना. केसरकर

शिधापत्रिका आधार लिंकसाठी मोहीम राबवा : ना. केसरकर

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:55PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

शिधापत्रिका आधार लिंकबाबत जिल्ह्यात 82 टक्के कार्य झाले आहे. तथापी अद्याप 18 टक्के शिधापत्रिका आधारशी लिंक होणे बाकी आहे. त्यामुळे हे 18 टक्के शिधापत्रिका धारक धान्य घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पुरवठा दक्षता समितीची बैठक ना.  केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्ह्यातील धान्य पुरवठा, रॉकेल पुरवठा, धान्य गोदाम याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

शिधापत्रिका आधारशी लिंक न झाल्यास धान्य पुरवठा बंद होणार असल्याने याबाबत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याची सूचन ना. केसरकर यांनी केली. या विशेष मोहिमेद्वारे सर्व शिधापत्रिका आधारशी लिंक केल्या जाव्यात. यामुळे सर्वांना धान्य मिळू शकेल. धान्य पुरवठा संदर्भात सॉफ्टवेअर अपडेट केले गेले आहे. यामुळे काही शिधापत्रिका धारकांची नावे दिसत नसतील अशा लाभार्थ्यांनी पुन्हा ऑनलाईन नोंदणी करावी. धान्य कमिशन केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्यानाच मिळणार आहे. याबाबत ठराव करून शासनाकडे पाठविण्यात यावा.

यादीनुसारच रॉकेल वितरण धान्य दुकानदारांनी करावे, धान्य गोदामातून धान्य वितरण केल्यानंतर वजनात फरक येतो, याबाबत पुरवठा विभागाने तपासणी करावी, ज्येष्ष्ठ नागरिक तसेच अपंगांना धान्य दुकानापर्यंत धान्य घेण्यासाठी येणे शक्य नसते. याबाबत धोरण ठरविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आदी सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.

प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी स्वागत करुन मागील इतिवृत्ताचे वाचन केले. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 74 हजार 452 किलो तुरडाळीचे वितरण झाले असून 63 हजार किलो तूरडाळ साठा शिल्लक असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, समितीचे अशासकीय सदस्य स्नेहा तेंडुलकर, वर्षा कुडाळकर, राजश्री धुमाळे, राजन चिके, भावना कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.