Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Konkan › किल्ले सिंधुदुर्गसमोरील जेटीचे काम सीआरझेडच्या विळख्यात

किल्ले सिंधुदुर्गसमोरील जेटीचे काम सीआरझेडच्या विळख्यात

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:11PMमहेश कदम

मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग समोरील सुमारे नवीन बंदर जेटीचे काम पर्यावरणाचा दाखला व सीआरझेडच्या विळख्यात अडकले आहे. या कामासाठी दोन वर्षापूर्वी शासनाने निधी मंजूर केला. बंदर जेटीचे काम मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच गेले दोन वर्षे नवीन बंदर जेटी बांधण्याचे काम रखडले आहे. 

सध्या अस्तित्वात असलेली जेटी ही पूर्णतः जीर्ण झाली आहे. किल्ले दर्शनासाठी जाणार्‍या पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. परिणामी ती अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन जेटीचे काम लवकर मार्गी लागणे आवश्यक  आहे. सद्यःस्थितीत किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या विनंतीनुसार पर्यटकांना सावली मिळावी यासाठी बंदर विभागाच्यावतीने बंदर जेटी येथे प्रवासी शेड उभारण्यात आली आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून बंदर जेटीच्या प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक पथदिवे बसविण्यात आले आहेत. 

सुरवातीच्या काळात किल्ले दर्शनास जाणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षात घेत ही जेटी सुयोग्य होती. मात्र आता हजारोंच्या संख्येने पर्यटक किल्ले दर्शनासाठी या बंदर जेटीवर गर्दी करत असल्याने ती अपुरी पडते,  तसेच पर्यटकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नसल्याचे चित्र आहे. नवीन जेटीचे काम करताना सीआरझेडची समस्या तसेच पर्यावरण विभागाचा दाखला घेणे आवश्यक होते. मात्र याची कोणतीही पूर्तता न करता मेरीटाईम बोर्डाने घिसाडघाई करत निविदा प्रक्रिया राबविली. परिणामी कागदपत्रांच्या पूर्तते अभावी गेली दोन वर्षे हे काम रखडले आहे. शिवाय आता कागदपत्रांची पूर्तता झाल्यास नव्याने अंदाजपत्रक बनवावे लागणार आहे. तसेच नव्याने निविदा प्रक्रियाही राबवावी लागणार आहे.

बंदर विकास राज्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

येथील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या बंदर जेटीचे काम सीआरझेड व पर्यावरण विभागाचा दाखला न मिळाल्याने रखडले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

आ. वैभव नाईकांचे केवळ आश्‍वासनच

ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग समोरील बंदर जेटीच्या सुशोभीकरण कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 4 कोटी 99 लाख रुपये खर्चाच्या जेटीच्या कामास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मान्यता दिली. जेटीची अद्ययावत उभारणी करताना या जेटीला ऐतिहासिक स्वरूप दिले जाणार आहे. ओहोटी वेळी जेटीलगत कमी पाण्यामुळे होडी व्यावसायिकांची समस्या लक्षात घेता जेटीची लांबीही वाढविली जाईल. नवीन जेटीचे काम करताना पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्वीची जेटी तशीच ठेवली जाईल. या कामाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच हे काम मार्गी लागेल असे आश्‍वासन दोन वर्षापूर्वी आ. वैभव नाईक यांनी दिले होते. त्यामुळे नवीन बंदर जेटीचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा स्थानिकांना होती. प्रत्यक्षात हे काम सीआरझेड आणि पर्यावरणाचा दाखला न मिळाल्याने रखडल्याची माहिती  आहे.