Wed, Apr 24, 2019 00:25होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांचा दौरा भाजपला देणार नवसंजीवनी

मुख्यमंत्र्यांचा दौरा भाजपला देणार नवसंजीवनी

Published On: Feb 12 2018 1:54AM | Last Updated: Feb 11 2018 7:59PMरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभा मतदार संघ काबिज करण्याच्या दिशेने भाजपने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यमंत्री तथा भाजप जिल्हा संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड वारंवार जिल्ह्याचे दौरे करून स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना बळ देऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दौरा निश्‍चित करण्याची धावपळ सुरू झाली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व पातळीवर राज्यात एकहाती सत्ता आणण्याचा विचार पक्‍का झाला आहे. राज्यात आमदार आणण्याच्या गणितात रत्नागिरी जिल्ह्यातून तीन आमदार असावेत, असे समीकरण ठरले आहे. निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे येथील प्रयत्न नुकतेच सुरू झाले आहेत. विधान परिषदेचे आ. प्रसाद लाड यांना जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्यांचा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी देऊन मतदारांना आकर्षित केले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप सदस्यांना सेनेकडून अपेक्षित सहकार्य लाभत नाही. भाजप सदस्यांची विकासकामे रखडू नयेत यासाठी आ. लाड यांचा आमदार निधी वापरला जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्यांनी कामांच्या याद्या बनवण्यास प्रारंभ केला आहे. जोडीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांसोबत येऊन आ. लाड यांनी भाजप स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासही प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सत्तेवर सेना असल्याने अधिकारी वर्गालाही त्यांच्या कलेने जावे लागते. अशा अधिकार्‍यांना ना. चव्हाण व आ. लाड यांनी आपले राजकीय कौशल्य अवगत करून देण्याचाही सपाटा लावला आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी, गुहागर, देवरूख न. पं. मुख्याधिकार्‍यांसह भाजप सदस्यांना सोमवारी मुंबईत एकत्र आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदार संघ काबिज करण्यासाठी त्या-त्या ठिकाणच्या 2014च्या मतदानाची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला 54,449 मते मिळाली होती. पाचही मतदार संघांपैकी रत्नागिरीत सर्वाधिक मते असल्याने या मतदार संघातील जोर वाढवण्यात आला आहे. 

पाठोपाठ गुहागर मतदार संघातील भाजप उमेदवाराला 39,761 मते मिळाली असून, तिसरा मतदार संघ दापोली आहे. येथून भाजप उमेदवाराला 13,971 मते मिळाली आहेत. राजापुरातून 9,953 तर चिपळूण मतदार संघात 9,143 मते मिळाली आहेत.  2014 च्या निवडणुकीतील मताधिक्यानुसार भाजपने प्राधान्यक्रमानुसार हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. जिथे सेनेत धुसफूस आहे तेथे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे.