Thu, Mar 21, 2019 16:16होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे रिफायनरीग्रस्तांना दिलासा

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे रिफायनरीग्रस्तांना दिलासा

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:42PMविजयदुर्ग : वार्ताहर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाणार येथील रिफायनरी प्रकल्प स्थानिक शेतकर्‍यांना नको असेल तर तो त्यांच्यावर लादणार नाही असे आश्‍वासन दिल्यामुळे रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

उध्दव ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वी झालेल्या कोकण दौर्‍यात नाणार प्रकल्पाला जर स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, वैभव नाईक, उदय सामंत, अनिल परब तसेच प्रकल्पबाधित गावातील सरपंच या बैठकीस उपस्थित होते. 

ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाला 92 टक्के लोकांचा विरोध असल्याचे सांगत असहमतीपत्र दिले. कोकणातील जनतेवरच विनाशकारी प्रकल्प का लादले जातात? असा सवाल केला असता, मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचा विरोध असेल तर याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्‍वासन दिले. एनजीओंच्या माध्यमातून जो विरोध केला जात आहे त्यांच्या मागण्यांपेक्षा स्थानिकांच्या मागण्यांना सरकार प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार होवू देणार नसल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलेे. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे आता नाणार प्रकल्प विरोधकांची आशा बळावली  आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरही प्रकल्पाच्या हालचाली सुरू राहणार का? याबाबतही स्थानिकांमध्ये संभ्रम आहे.

अशोक वालम बैठकीपासून दूरच

मुख्यमंत्र्यांसोबत नाणार रिफायनरीबाबत झालेल्या या बैठकीला कोकण रिफायनरी विरोध संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना बोलविण्यात आले नाही. याबाबत वालम यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेने केवळ 4 स्थानिक लोकांना घेवून आपल्यासोबत प्रकल्पबाधित असल्याचे सांगत बैठक घेतली. 23 नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत  ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी जो औद्योगिक अध्यादेश काढला तो मागे घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी 15 दिवसांत उद्योगमंत्र्यांना सांगून हा अध्यादेश मागे घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप हे आश्‍वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत साशंकता वाटत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष अशोक वालक यांनी केला. त्यामुळे अजूनही काही स्थानिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे.