Thu, Jun 27, 2019 12:09होमपेज › Konkan › पत्रकार भवनासाठी तातडीने निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

पत्रकार भवनासाठी तातडीने निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 9:56PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी येथे नियोजित आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्‍वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष नंदू महाजन, पत्रकार संतोष राऊळ या शिष्टमंडळाने ही भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस हे माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या पडवे येथील हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला आले होते. आ.नितेश राणे यांनी पत्रकार शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून दिली.

गजानन नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. पत्रकार भवनासाठी शासनाकडे भुखंड हस्तांतरीत केला आहे. भवनाच्या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देवून निविदाही काढण्यासाठी मात्र निधी नसल्याने संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देता आला नाही. याकडे निवेदनात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. गजानन नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांचे म्हणणे ऐकूण घेवून निधी देण्याची कार्यवाही लगेचच करतो, अशी ग्वाही दिली.