होमपेज › Konkan › अंकिता जंगम खुनाचा तपास लवकरच ‘सीआयडी’कडे

अंकिता जंगम खुनाचा तपास लवकरच ‘सीआयडी’कडे

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 9:44PMखेड : प्रतिनिधी

खेड तालुक्यातील अंकिता जंगम हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर देखील अनेक दिवस उलटल्याने तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेसाठी पाठपुरावा करावा लागला. आता काही दिवसांमध्येच या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय स्वामी जंगम यांनी सोमवार दि.23 रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

खेड तालुक्यातील ऐनवली गावातील अंकिता जंगम हिच्या संशयास्पद खूनप्रकरणी  जंगम समाजाने अंकिताच्या संशयास्पद मृत्यूचा योग्य पद्धतीने तपास व्हावा, या मागणीसाठी दि.19 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी केले. दि.19 फेब्रुवारी रोजी खेड येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. वीरशैव लिंगायत महासंघाचे साखळी उपोषण तब्बल अकरा दिवस सुरू होते. 

शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम व युवा सेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम यांनी या प्रकरणी लक्ष देऊन जंगम समाजाचे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीचे आश्‍वासन दिले. अंकिता जंगम मृत्यू प्रकरण विधानसभेत देखील गाजले व खेडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॅनिअल बेन यांना पदावरून दूर करण्यात आले. 

सोमवार दि. 23 एप्रिल रोजी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय स्वामी जंगम हे खेड येथे आले होते. त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्यासह प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांची भेट घेऊन या घटनेबाबत चर्चा केली. सायंकाळी त्यांनी या घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अंकिता जंगम मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने करून फाईल बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘सीआयडी’ चौकशीचे आश्‍वासन देऊन देखील प्रत्यक्ष तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्याच्या  प्रक्रियेतही महासंघाला  पाठपुरावा करावा लागला. त्यामध्ये युवा सेनेचे योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आता याबाबतचा आदेश अधिकृतपणे निघाला आहे. त्यामुळे काही दिवसांतच ‘सीआयडी’कडे हा तपास सोपवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरदेखील आम्हाला पाठपुरावा व महाराष्ट्र दिनी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली.

यावेळी जंगम म्हणाले की, दि.2 मार्च रोजी उपोषण स्थगित केल्यानंतर देखील अद्याप ‘सीआयडी’ कडे तपास वर्ग झालेला नसताना पोलिसांनी तपासात कोणतीच प्रगती केलेली नाही. त्यामुळे केवळ एका पोलिस निरीक्षकावरच नव्हे तर या प्रकाराला जबाबदार स्थानिक पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी व शवविच्छेदानाचा दिशाभूल करणारा अहवाल देणार्‍या कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यावर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. यापुढे अंकिता जंगम मृत्यू प्रकरणी आरोपी ज्या कंपनीतील कामगार आहेत त्याचा मालकच मुख्य सूत्रधार आहे, असे आमचे ठाम मत असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास होणे गरजेचे आहे.