Tue, Jan 22, 2019 01:44होमपेज › Konkan › स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर!

स्मशानभूमीवरही सीसीटीव्हीची नजर!

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 9:25PMखेड : प्रतिनिधी

आपण बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिर व अन्य सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पाहतो. अगदी शहरातील चौकांसह शासकीय व खासगी कार्यालयातही सीसीटीव्ही असतात. मात्र, आता खेड तालुका वैश्य समाज स्मशानभूमीमध्येही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही स्मशानभूमीही सीसीटीव्हीच्या नजर कक्षेत आली आहे.

अलिकडे स्मशानभूमीची ठिकाणे प्रेमी युगुले व समाजकंटकांची अड्डा बनली आहेत. पार्ट्या, जुगार आदींसाठी ही ठिकाणे प्रसिद्धीस आली आहेत. खेड तालुका वैश्य समाजाची येथील जगबुडी नदीच्या किनार्‍यालगत स्मशानभूमी आहे. परंतु या स्मशानभूमीत खेड शहर व ग्रामीण भागातील व्यक्‍ती अनैतिक गोष्टींसाठी या जागेचा वापर करतात. धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन या ठिकाणी केल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पार्ट्यांमुळे स्मशानभूमीत अस्वच्छता निर्माण होते. 

या गोष्टीची दखल घेऊन वैश्य समाजाने स्मशानभूमीत चक्‍क सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्य करणार्‍या लोकांचे या ठिकाणी चित्रीकरण होऊ शकते व संबंधित व्यक्‍ती सापडू शकतात हा त्या मागील हेतू आहे. तरीही असा प्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 
संबंधितांची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. स्मशानभूमी सीसीटीव्हीच्या कार्यकक्षेत येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. ’