Sun, May 26, 2019 17:12होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यातील ४१९ गणेश घाटांवर राहणार सीसीटीव्ही वॉच!

रत्नागिरी जिल्ह्यातील ४१९ गणेश घाटांवर राहणार सीसीटीव्ही वॉच!

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:41PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणेशोत्सवात जिल्ह्यातील उत्साही वातावरणातील विघ्न टाळण्यासाठी प्रशासनाने व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपसह गणेश विसर्जनादरम्यान जिल्ह्यातील 17 प्रमुख विसर्जनस्थळांवर आणि 402 गणेश घाटांवर जिल्हा प्रशासनातर्फे सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने  पोलिसांच्या सहकार्याने आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सतर्क केली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सुमारे पावणे दोन लाख घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दि. 13 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या उत्सवातील विघ्न टाळण्यासाठी प्रशासनाने आपत्ती निवारण यंत्रणेबरोबरच प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे. प्रतिष्ठापना झाल्यानंतर जिल्ह्यात दीड दिवसाच्या गौरी विसर्जन दिनी (दि.16) आणि अनंत चतुर्दशीला (दि. 23) होणार्‍या  गणेशमूर्ती विसर्जन सोहळे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाने विसर्जनस्थळांवर सुरक्षा आणि सतर्क यंत्रणा प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महामार्गावर होणार्‍या वर्दळीची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख अपघात स्थळांवरही सीसीटीव्ही वॉच ठेवण्यात आला आहे. 

महामार्गावरील  संभाव्य अपघातात तातडीच्या उपाययोजनांसाठी पोलिसांचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे 16 व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपही सज्ज ठेवण्यात आले आहेत. या यंत्रणेचे नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि  जिल्हा पोलिस मुख्यालयात राहणार आहेत. याचबरोबर विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी किनार्‍यांवर जीवरक्षकांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यांना अत्याधुनिक सामग्री, विमा संरक्षणासह  आवश्यक त्या सुविधा देण्यात आहेत. 

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी प्रशासनाने गणेशघाट आणि किनारी भागात होणार्‍या गणेश विर्जनस्थळावर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. या ठिकाणी पाणी, वीज आणि आरोग्याच्या यंत्रणेसह स्वच्छतेच्या सुविधा उभारण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिली.

विसर्जनस्थळांवर 500 पोलिसांचा ताफा

रत्नागिरीसह राजापूर, गुहागर, दापोली या सागरी किनार्‍यांवरही जिल्हा प्रशानाने आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क केली आहे. यासाठी सुमारे 500 पोलिसांचा ताफा विसर्जन स्थळांवर तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, गणेश घाटांवर निर्माल्य आणि अन्य कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.