Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Konkan › स्मारके, पुतळ्यांवर ‘सीसीटीव्ही’ वॉच!

स्मारके, पुतळ्यांवर ‘सीसीटीव्ही’ वॉच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

राष्ट्रीय पुरुषांची स्मृतीस्थळे, पुतळे, स्मारके संरक्षण, सुशोभीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या संहितेत  बदल करण्याची प्रक्रिया  सुरू करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावरील या स्मारकांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. अलीकडेच खेड आणि चिपळूण तालुक्यांत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल प्रशासनाने घेतली असून त्यानुसार  या स्थळांवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लागोपाठ अशा दोन घटना घडल्याने प्रशासनाने याबाबत  गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. खेड तालुक्यात जिजामाता उद्यानात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात कळंबस्ते येथे जयभीम स्तंभाची मोडताड अज्ञातांनी केली. या दोन्ही घटनांनी जिल्हाभर वातावरण ढवळून निघाले होते. या दोन्ही घटनास्थळांवर सीसीटीव्ही किंवा तत्सम यंत्रणा नसल्याने यामध्ये असलेल्या संघटना किंवा व्यक्‍तीचा तपास अद्यापही पोलिस घेत आहेत. 

खेडमधील घटनेने तर अन्य ठिकाणी असलेेल्या सीसीटीव्हीची मदत गुन्हेगारांना शोेधण्यासाठी घेण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या घटनांतील सहभागी असलेल्या समाजकंटकाचा छडा लागलेला नाही. या घटनांनंतर झालेल्या उद्रेकांतून अनेक संंघटनांनी मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या  संरक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणाची आवश्यकता असल्याची मागणी नोंदविली आहे. त्याची दखल घेत आता प्रशासनाने अशा स्थानिक स्थळांच्या संहितेत बदल करण्याची तयारी केली आहे. यामध्ये आता या स्थळावर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे 350 हून अधिक अशी स्मारके आणि पुतळे आहेत. त्याला आधुनिक तंत्राची जोड देताना या स्थळांवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. 

Tags ; Konkan, Konkan News, CCTV, Watch, Monuments,  Statues!


  •