Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्ष निवडणूक होणार तिरंगी

राजापूर नगराध्यक्ष निवडणूक होणार तिरंगी

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:29PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या बंडखोर उमेदवार शीतल पटेल व काँग्रेसकडून डमी म्हणून भरलेला अर्ज स्नेहा कुवेस्कर यांनी माघारी घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असून, यावेळीही तिरंगी लढत होणार, हे निश्‍चित झाले आहे. 

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीमध्ये एकूण 5 उमेदवारांचे अर्ज रिंगणात होते. त्यामध्ये काँग्रेसकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्यासह विद्यमान नगरसेविका स्नेहा कुवेस्कर, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर, भाजपकडून नगरसेवक गोविंद चव्हाण व उमेदवारी डावलली गेल्याने बंडखोरी करणार्‍या  माजी उपनगराध्यक्षा शीतल पटेल असे पाचजणांचे अर्ज रिंगणात होते. काँग्रेसकडून जमीर खलिफेंची उमेदवारी अंतिम होती. तर स्नेहा कुवेस्कर यांचा अर्ज डमी स्वरूपात होता. त्यामुळे कुवेस्कर माघार घेणार, हे निश्‍चित होते; पण भाजपमधील झालेली बंडखोरी शमणार का? याकडे अनेकांचे लक्ष होते.

शीतल पटेल यांनी माघार घ्यावी म्हणून पक्षाकडून तसे प्रयत्न सुरु होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले व शीतल पटेल यांनी आपली तलवार म्यान करीत आपला अर्ज मागे घेतला. काँग्रेसकडून डमी म्हणून दाखल केलेला अर्ज कुवेस्कर यांनी मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात काँग्रेसआघाडी, शिवसेना व भाजप अशी तिरंगी रंगणार आहे. त्यामुळे राजापुरात होणार्‍या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीचे चित्रदेखील स्पष्ट झाले आहे.