Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Konkan › दिवसा घरफोडी करणारी ‘बंटी-बबली’ गजाआड

दिवसा घरफोडी करणारी ‘बंटी-बबली’ गजाआड

Published On: Mar 05 2018 9:23PM | Last Updated: Mar 05 2018 9:11PMकणकवली : प्रतिनिधी

डिसेंबर 2017 च्या पहिल्याच दिवशी कणकवली जानवली-रामेश्‍वरनगर येथील सुजाता गणपत सावंत यांचे घर फोडून 19 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा मिळून सुमारे 5 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी संशयित म्हणून मयूर सोपान भुंडे ऊर्फ अमित सोपान पाटील (वय 31) आणि त्याची पत्नी सोनाली ऊर्फ पूजा मयूर भुंडे (27, दोन्ही रा. साईलीला अपार्टमेंट, उज्ज्वलनगर, बोरगड, नाशिक) यांना रविवारी सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. या जोडीला कणकवली पोलिसांनी अटक केली. 

त्या चोरीच्या घटनेपूर्वी काही दिवस आधी गोव्यात झालेल्या एका घरफोडीमध्ये सीसीटीव्हीमध्ये एक महिला आणि पुरुष कैद झाली होती. ती क्लिप पोलिसांनी मागून घेत तीच बंटी-बबलीची जोडी या चोरीत सहभागी आहे का? याचा तपास केला होता. 

याच संशयावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या बंटी-बबली जोडीचा माग काढत नाशिक गाठले. नाशिक उज्ज्वलनगर येथे भाड्याने रूम घेऊन मयूर भुंडे आणि त्याची पत्नी सोनाली भुंडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिताफीने या पथकाने या जोडीला ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत त्यांची एक वर्षाची मुलगीही आहे. या बंटी-बबली जोडीवर पुणे, कराड, सांगली, नाशिक, गोवा अशा ठिकठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मयूर भुंडे हा मूळचा रायगड जिल्ह्यातला. त्याच्या पहिल्या पत्नीचे कात्रज येथे दुकान होते. सध्या त्याची पहिली पत्नी हयात नाही. तो दुसर्‍या पत्नीसोबत राहतो. ही जोडी दिवसाढवळ्यादेखील घरफोडी करते, ही त्यांची खासियत आहे.