Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Konkan › दापोली-गुहागर समुद्रात बुलनेट मासेमारी?

दापोली-गुहागर समुद्रात बुलनेट मासेमारी?

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:16PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

दापोली आणि गुहागर समुद्रात केंद्र शासनाने बंदी घातलेली बुलनेट मासेमारी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मासेमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच बुलनेट मासेमारी करणार्‍या बोटींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुहागर आणि दापोली परवाना अधिकार्‍यांकडून अशा बॅन घातलेल्या मासेमारीला लगाम घालण्यास दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ पातळीवरून ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

दापोलीला 35 कि.मी.चा समुद्र किनारा असून, यातील दापोलीसह दाभोळ, बुरोंडी, हर्णे आणि गुहागर समुद्रात केंद्राने बॅन केलेली बुलनेट मासेमारी होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. गुहागरला 38 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. ट्रॉलिंग मासेमारीपेक्षा बुलनेट जाळ्याच्या तोंडाची व्याप्‍ती 5 ते 10 पटीने मोठी असते. त्यामुळे शाश्‍वत मासेमारीला त्रास होताच, त्याचबरोबर या बुलनेट मासेमारीने पर्यावरणाचाही र्‍हास होतो.

त्यामुळेच केंद्र शासनाने अशा पद्धतीच्या मासेमारीला नुकतीच बंदी घातली आहे. दापोली-गुहागरात 500 पेक्षा अधिक ट्रॉलर असून, त्यातील 50 टक्के ट्रॉलरकडून बुलनेटने मासेमारी केली जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या दोन्ही तालुक्यातील परवाना अधिकारी अशा मासेमारीवर कारवाई करण्यास धजावत नसल्याने या तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्या आहेत. दोन ट्रॉलिंग बोटी बुलनेट वापरून मासेमारी करतात. या जाळ्याच्या तोंडाचे ओपनिंग 100 फुटाचे असून, यातून समुद्रातील लांबच्या लांब अंतर व्यापून मासेमारी केली जाते. या प्रकारच्या मासेमारीला केंद्र शासनाने नुकतीच बंदी घातली आहे. 

मासेमारीचे 15 दिवस वाया...

पूर्वी मासेमारी हंगाम आठ महिन्यांचा होता. अधिसूचनेमुळे तो आता पाच महिन्यांवर आला आहे. त्यातही ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर 3 ते 8 नोव्हेंबरपर्यंत मासेमारी बंद होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये मतलई वार्‍यांमुळे 3 ते 4 दिवस मासेमारी करणार्‍या बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. अशा या कमी कालावधीत मच्छीमारांचे 15 दिवस असेच मासेमारीविना वाया जाऊन नुकसान झाले आहे.