होमपेज › Konkan › कर्जदार महिलेला कारवाईची धमकी 

कर्जदार महिलेला कारवाईची धमकी 

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:17PMबांदा : प्रतिनिधी

कर्जवसुलीसाठी बांदा शहरातील महिला कर्जदाराला कारवाईची धमकी दिल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रविणकुमार घरडे यांना स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी व्यवस्थापक घरडे यांच्यावर कारवाईसाठी बांदा पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या मांडला. ग्रामस्थानच्या आक्रमक भूमिकेमुळे बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप प्रामाणिक यांनी शाखाधिकारी घरडे यांची तात्काळ बदली केल्याचे जाहीर केले. घरडे यांच्या माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

बुधवारी सकाळपासून बांदा शहरात बँक ऑफ इंडियाची कर्ज वसुली मोहीम सुरू होती. शाखाव्यावस्थापक श्री. घरडे हे शिपायासह शहरातील एका महिलेकडे कर्जवसुलीसाठी गेले होते. महिलेने घरात कोणीही नसल्याने कर्जाचा हप्ता भरण्यास असमर्थता दाखविली. तात्काळ पैसे न दिल्यास पुढील कारवाईचा इशारा दिला. या घटनेमुळे महिला घाबरल्याने तिने याची कल्पना सरपंच मंदार कल्याणकर यांना दिली.

कल्याणकर यांनी याठिकाणी येत घरडे यांना जाब विचारला. यावेळी उपसरपंच अक्रम खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, हर्षद कामत, जावेद खतीब, राजेश विरनोडकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, प्रीतम हरमलकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी याठिकाणी येत घरडे यांना घेराव घातला. तसेच कडक शब्दात सुनावले. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने बांदा पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बँकेचे शिपाई श्री. राऊळ हे अत्यवस्थ झाल्याने त्यांना  खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

ग्रामस्थांनी व्यवस्थापक घरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याने बांदा पोलिसांनी घरडे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस स्थानकावर बँकेचे शेकडो ग्राहक गोळा झाले. कळेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून याची कल्पना बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप प्रामाणिक, क्षेत्रीय व्यवस्थापक अश्विन काकतकर, पिंगुली शाखा व्यवस्थापक नंदकुमार प्रभुदेसाई, सावंतवाडी शाखा व्यवस्थापक स्मिता सबनीस, सिक्युरिटी इंचार्ज त्रिभुवन सिंग बांदा पोलिस ठाण्यात दाखल झाले.

यावेळी उपस्थित बँकेच्या ग्राहकांनी श्री. घरडे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. घरडे यांची तत्काळ बदली न झाल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. तसेच कारवाई न झाल्यास पुढील होणार्‍या परिणामांना सर्वस्वी बँक व्यवस्थापन जबाबदार राहील, असे स्पष्ट केले. यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी घरडे यांना सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले.  पोलिस, लोकप्रतिनिधी व बँकेचे अधिकारी यांच्या झालेल्या चर्चेअंती व्यवस्थापक घरडे यांनी झालेल्या प्रकाराबाबत लेखी माफी मागितली, तसेच भविष्यात कोनाविरोधातही दिवाणी व फौजदारी तक्रार करणार नसल्याचे लिहून दिले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.

यावेळी सिद्धेश महाजन, संदीप सावंत, सागर कुबडे, समीर कल्याणकर, सुनील धामपूरकर, विशांत पांगम, अक्षय मयेकर, विनोद शिरोडकर  यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.