Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Konkan › कोकणातील रिफायनरी रद्द होणे करंटेपणा ठरेल : मुख्यमंत्री

'त्या' रिफायनरीला धंदेवाईक एनजीओंचा विरोध : CM

Published On: Dec 19 2017 2:14PM | Last Updated: Dec 19 2017 2:58PM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

कोकणातील रिफायनरीला विरोध हा मुंबई आणि राज्याबाहेरील धंदेवाईक एनजीओंनी लोकांना भडकवल्यामुळे होत असून खोटी माहिती या एनजीओंकडून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ही रिफायनरी तेथे आणण्यासाठी शिवसेनाही आमच्याबरोबरच होती, असेही त्यांनी सांगितले. सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी फडणवीस बोलत होते. 

कोकणातील नियोजित रिफायनरीमुळे मासेमारीसह अन्य अनेक बाबतीत कोकणवासियांचे नुकसान होणार आहे, असा अपप्रचार या एनजीओंकडून केला जात असला, तरी त्यात काहीही तथ्य नाही. सगळ्याच पेट्रोलियम कंपन्यांकडून स्थापली जाणारी ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी असून त्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. यासाठी घेतली जाणारी ४० टक्के जागा गुंतवणूकदारांची असून त्यामुळे एक लाख स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सुमारे तीन लाख कोटींची अशी गुंतवणूक देशातील अन्य राज्यात कुठेही नाही. विरोधामुळे रिॅफायनरी प्रकल्प अन्यत्र गेला, तर तो आपलाच करंटेपणा ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. 

रिफायनरीला विरोध करणार्‍या समितीसोबतच आता रिॅफायनरी बचाव समितीदेखील स्थापन झाली असून या समितीकडून गावागावात जाऊन रिफायनरीचे फायदे लोकांना समजावून सांगितले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ही रिफायनरी कोकणात यावी यासाठी प्रयत्न करताना शिवसेनाही आमच्यासोबत होती. सेनेचे मंत्री अनंत गीते हे आमच्यासह समितीत होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.