Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Konkan › वाढीव अनुदान द्या; अन्यथा खुर्च्या खाली करा!

वाढीव अनुदान द्या; अन्यथा खुर्च्या खाली करा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

अंध-अपंग, तसेच असहाय्य घटकांचा राखीव निधी हडप करण्यासंबंधी कारवाई करा, महागाईत होरपळणार्‍या अंध-अपंगांना वाढीव अनुदान द्या; अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत बुधवारी अंध-अपंग, तसेच नागरिकांनी सावंतवाडी शहरातून आक्रोश मोर्चा काढला.

आदिनारायण मंगल कार्यालय येथून मोर्चास सुरुवात झाली. अंध-अपंग बांधवांना माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सालईवाडा, बाजारपेठ, गांधी चौक, एस.टी. स्टँड रोड ते प्रांत कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. 

अपंगांच्या समस्या, वाढती महागाई, रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणारे युवक, शासकीय सुविधांमध्ये होणारे गैरप्रकार, या व इतर अनेक गैरप्रकारांविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.शेकडोंच्या संख्येने अंध-अपंग बांधव व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

शिष्टमंडळाशी चर्चा

मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय परिसरात आल्यावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे आदिंनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तुटपुंज्या आर्थिक अनुदानामुळे अंध-अपंग तसेच असहाय्य घटक महागाईत होरपळत आहेत. अंध, अपंगांना जीवनावश्यक सेवा स्वस्त दरात सेवा तत्वावर देण्यात याव्यात, शासकीय अनुदान गोवा, कर्नाटकच्या धर्तीवर वाढवून मिळावे यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.

बांधकाम  विभागाकडून रस्त्यांचे काम निकृष्ट होत आहे अशी तक्रार मांडत बांधकाम विभागाच्या कार्यालयावरही मोर्चा नेण्यात आला. खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेक युवक मृत्युमुखी पडत असून त्यांची कुटुंबे अनाथ, निराधार जीवन जगत आहेत. साईडपट्टयांची कामे न करणे, निकृष्ट दर्जाचे धोकादायक रस्ते यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाईचे नवीन कायदे अंमलात आणले जावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.महालक्ष्मी अंध अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर, उपाध्यक्ष आत्माराम परब, विठ्ठल शिरोडकर, सुनील पेडणेकर यांच्यासह शेकडो अंध अपंग बांधव यावेळी उपस्थित होते.   


  •