होमपेज › Konkan › वेळंब येथे बंदुका तयार करणार्‍या लोहारास अटक

वेळंब येथे बंदुका तयार करणार्‍या लोहारास अटक

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:23PM

बुकमार्क करा




शृंगारतळी : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रत्नागिरीच्या गुन्हा अन्वेषण शाखेने धाड टाकून लोहारकाम करणार्‍याकडून तीन बंदुका व अन्य साहित्य जप्‍त केले. या प्रकरणी रमेश शंकर काताळकर (49) यास अटक करण्यात आली आहे. गुरुवार दि. 11 रोजी ही कारवाई करण्यात आली. तो बंदुका तयार करुन विकत असल्याची माहिती मिळताच हा छापा टाकण्यात आला.

वेळंब येथे रमेश शंकर काताळकर हा बंदुका दुरूस्त करतो, नवीन बंदुका व बंदुकीचे साहित्य तयार करतो, अशी खबर गुन्हा अन्वेषण विभागाला लागली होती. त्यानुसार दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाने वेळंब येथे काताळकर याच्या लोहारकामाच्या दुकानावर धाड टाकली. कोणत्याही प्रकारचा शस्त्र बनविण्याचा व दुरूस्ती करण्याचा परवाना नसताना या ठिकाणी बेकायदेशीर बंदुकीचे साहित्य आढळून आले.

 पोलिस पथकाला या ठिकाणी जवळपास तयार झालेल्या दोन सिंगल बॅरल बंदुका व एक तयार होत असलेली डबल बॅरल बंदूक आढळून आली. त्याचप्रमाणे बंदुकीचे इतर सामान व तयार करण्याचे साहित्य असे मिळून एकूण 10 प्रकारचे साहित्य पोलिसांनी जप्त केले व गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रमेश शंकर काताळकर यास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पो. उपनिरीक्षक माने, हे. कॉ. दिनेश आखाडे, वाघे, वाहन चालक तांबे या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. 

वेळंंब येथील रमेश शंकर काताळकर याच्या या कारखान्यावर 2008 ला स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी या पथकाने धाड टाकून अशाच प्रकारचा मुद्देमाल जप्त केला होता व रमेश शंकर काताळकर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही रमेश काताळकर याने अशा प्रकारच्या बेकायदेशीर बंदुका बनविणे थांबविले नव्हते. त्याची खबर रत्नागिरी पोलिसांना मिळाल्या. या नंतर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.