Tue, May 21, 2019 12:27होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा जन्मोत्सव

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा जन्मोत्सव

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 20 2018 1:17AMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी शिवजयंतीनिमित्त कानाकोपर्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. 350 वर्षांपूर्वी छत्रपतींनी बांधलेल्या मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमान पक्ष आणि वायरी भूतनाथ ग्रामपंचायत, तसेच इतर संस्थांनी हा उत्सव साजरा केला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर सोमवारी उत्सवी वातावरण होते. भगवे फेटे बांधून महिलाही मोठ्या प्रमाणात या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. 

सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर केली असल्यामुळे या कार्यक्रमात शिवप्रेमींची विशेष गर्दी होती. शासकीय कार्यालये आणि शाळांमध्ये सकाळच्या सत्रात हा उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा शाळकरी मुलांनी आपल्या भाषणांमधून सांगितली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ या मोठ्या शहरांबरोबरच देवगड, वैभववाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या छोट्या शहरांमध्येही शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी दिवसभर सिंधुदुर्ग पोलिसांनी नाकाबंदी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. सोमवारी शिवजयंती उत्सव अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. शहरांमध्ये या उत्सवादरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवलीत सकल मराठा समाजाने पुढाकार घेऊन सर्व जातीधर्मांच्या लोकांना घेऊन शिवजयंती उत्सव साजरा केला. स्वाभिमान पक्षानेही अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा केला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.