Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Konkan › पाहा शतकातील मोठे खग्रास चंद्रग्रहण(Video)

पाहा शतकातील मोठे खग्रास चंद्रग्रहण(Video)

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 9:57PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवार, दि. 27 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. हे  चंद्रग्रहण 3 तास 55 मिनिटे होणार असून, त्यातील खग्रास स्थिती 1 तास 43 मिनिटे असणार आहे. संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसणार असले तरी ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल आणि चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार असेल तर एकूण ग्रहण कालावधी जास्त लागून    ग्रहणाची खग्रास स्थिती जास्त वेळ दिसू शकते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष  84 हजार कि.मीटर अंतरावर असतो. तो दीर्घ वर्तुळाकार मार्गाने पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतो. यावेळी शुक्रवार, 27 जुलै रोजी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर 4 लक्ष  6 हजार कि. मीटर अंतरावर असणार आहे. तसेच चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार आहे. 

त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे 3 तास 55 मिनिटे एवढा वेळ लागणार असून, खग्रास स्थिती 1 तास 43 मिनिटे एवढा वेळ दिसणार आहे. ज्यावेळी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येते त्याला खग्रास स्थिती म्हणतात. अशावेळी पौर्णिमा असूनही चंद्रबिंब जास्त प्रकाशित  न  दिसता काळसर, लालसर रंगाचे दिसते.गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण 16 जुलै 2000 रोजी झाले होते. त्यावेळी खग्रास स्थिती 1 तास 47 मिनिटे दिसली होती. यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे 9 जून 2123  व 19 जून 2141 रोजी होणार असून त्यावेळी खग्रास स्थिती 1 तास 46 मिनिटे दिसणार आहे.

रात्री 11.54 वा. प्रारंभ; पहाटे 3.49 वा. समाप्ती

चंद्र 11.54 वाजता पृथ्वीच्या पश्‍चिम बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. खग्रास स्थिती मध्यरात्री 1 वाजता सुरू होणार आहे. ग्रहणमध्य 1.52 रोजी होणार आहे. खग्रास स्थिती 2.43 वाजता संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला लागेल. पहाटे 3.49 वाजता ग्रहणाची समाप्ती होणार आहे. वातावरण ढगाळ नसले तर रत्नागिरीतून या ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहता येऊ शकतील.