Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Konkan › आंबोलीतील तरुणाची सायकलने सागरी मार्ग परिक्रमा

आंबोलीतील तरुणाची सायकलने सागरी मार्ग परिक्रमा

Published On: Dec 23 2017 2:07AM | Last Updated: Dec 22 2017 8:43PM

बुकमार्क करा

आंबोली : वार्ताहर

आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्री मार्गाने एकट़याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केले आहे. सुमारे 6780 किलोमीटरचा हा प्रवास त्याने सायकलने  72 दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात त्याने  एकूण नऊ राज्यातील समुद्र किनार पार केले.  

दिव, दमण, पाँडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधून त्याने प्रवास केला. दरम्यान, तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवाशांमध्ये त्याला वादळी पाऊसाचा  सामना करावा लागला. तरीही न डगमगता अभिषेकने हा टप्पा पार केला .

अभिषेक हा सध्या पुणे येथील एका पर्यटनाशी निगडित कंपनीमध्ये काम करतो.   त्याने यापूर्वी मनाली ते श्रीनगर हा 1065 किलोमीटरचा टप्पा सायकलने पूर्ण केला होता . त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक साहसी मोहिमा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. त्यात या समुद्री मार्गाचाही समावेश होता. यापूर्वी अशी सायकल मोहीम कोणी केली नसल्याने, त्याने ही मोहीम निश्‍चित केली.

अथक परिश्रम व खडतर प्रवासातून ही मोहीम त्याने  पूर्ण केली. या मोहीमेसाठी त्याने रोज 35 किमी. सायकल चालवून सराव  केला होता. 7 सप्टेंबर 2017 रोजी  लखपत - गुजरात येथून त्याने या मोहीमेचा प्रारंभ केला. दररोज सुमारे शंभर किलोमीटर सायकल चालवत त्याने ही मोहीम 72 दिवसांत यशस्वची केली. पश्चिम बंगाल येथे या सायकल सागर परिक्रमेची सांगता केली.

या मोहिमे दरम्यान अभिषेकने ठिकठिकाणी स्वच्छते बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेची आठवण म्हणून 9 राज्यातील प्रत्येक समुद्र किनार्‍यावरील वाळू आठवण म्हणून सोबत घेतल्याचे अभिषेकने सांगितले.