Thu, Mar 21, 2019 11:46होमपेज › Konkan › भुईबावडा घाटमार्गाची दुरवस्था कायम

भुईबावडा घाटमार्गाची दुरवस्था कायम

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:40PM-मारुती कांबळे

सिंधुदुर्ग व  कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा भुईबावडा हा घाटमार्ग करुळ घाटमार्गा इतकाच महत्त्वाचा घाटमार्ग आहे.  करुळ घाटमार्गाला पर्यायी घाट म्हणून या घाटमार्गाला विशेष महत्त्व आहे. मात्र, या घाटमार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या संरक्षण भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत कोसळलेल्या संरक्षण भिंती तशाच आहेत.  याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.  घाटमार्गातील ढासळलेल्या संरक्षण भिंती, कोसळलेल्या आधारभिंती, रस्त्याची झालेली दुरवस्था, खचलेल्या साईडपट्टया, मातीने भरलेली गटारे केव्हाही कोसळतील. अशा धोकादायक दरडींमुळे घाटमार्गातून जीव मुठीत धरुन वाहनचालक व प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे.  

गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भुईबावड्यापासून सुमारे 4 कि.मी.अंतरावर सुमारे 50 ते 60 फूट लांबीची संरक्षण भिंत खचलेली आहे.  याठिकाणी उपाययोजना केली नाही तर पावसाळ्यात याठिकाणी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. तर घाटमार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजीची कामे अद्याप करण्यात आलेली नाही.  त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

भुईबावडा घाटमार्ग हा सुमारे 12 कि.मी.लांबीचा मार्ग आहे. राजापूर, खारेपाटण, पाचल, भुईबावडा या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कोल्हापूरला जाण्यासाठी हा सोयीचा व कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. पावसाळ्यात करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यास भुईबावडा घाटमार्गाचा पर्यायी घाटमार्ग म्हणून वापर केला जातो. करूळ घाटमार्गाच्या तुलनेत भुईबावडा घाट मार्गातून वाहतूक कमी असल्यामुळे या घाटमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीला सा.बां.कडून दुय्यम स्थान दिले जाते. तर दुरुस्तीची कामे करताना सार्वजनिक बांधकामकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. पावसाळ्यात कोसळणार्‍या दरडी हटवून वाहतूक सुरू ठेवण्यातच धन्यता मानली जात आहे. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या घाटमार्गाच्या दुरवस्थेला बांधकाम विभागच जबाबदार आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

भुईबावडा घाटमार्ग मुळातच अरुंद आहे. एका बाजुला उंच कडे तर दुसर्‍या बाजूला खोल दरी यामुळे रस्ता रुंदीकरणाला मर्यादा येतात.  संपूर्ण घाटमार्गातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  त्यातच रस्त्याच्या दोन्हीही साईडपट्टया खचलेल्या आहेत.  काही ठिकाणी तर अर्ध्या फुटापेक्षा जास्त साईडपट्टया खचलेल्या आहेत. खराब रस्ता व खचलेल्यासाईडपट्टया यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. समोरुन येणार्‍या वाहानाला साईड देताना वाहन घसरुन अपघात घडत आहेत.

घाटमार्गातील गटारे ही दगड मातीने भरलेली आहेत.  त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय होत आहे. गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन साईडपट्टया वाहून चर पडले आहेत.  या गटारांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे.  

घाटमार्गात असलेली नागमोडी वळणे, पावसाळ्यात घाटमार्गात असणारे दाट धुके यामुळे वाहनचालकांना वळणांचा अंदाज येत नाही. यासाठी आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोसळलेल्या संरक्षण भिंती अद्याप बांधण्यात आलेल्या नाहीत. याठिकाणी बॅरल उभे करुन एकेरी वाहतूक सुरू आहे.  या पावसाळ्यात याठिकाणी आणखी रस्ता खचला तर वाहतूक बंद होण्याची भीती आहे.