Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Konkan › मोर्चाद्वारे महागाईचा निषेध

मोर्चाद्वारे महागाईचा निषेध

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 11:01PMरत्नागिरी : प्रतिनिधी    

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बंद’चा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला नाही. मात्र, आघाडीने काढलेल्या मोर्चात ‘मनसे’ व विरोधी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.  महागाई तसेच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीविरोधात निषेध मोर्चाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील  बाजारपेठा  आणि दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. 

केंद्र व राज्य शासनांचा निषेध करत या मोर्चाची सुरुवात रत्नागिरीत  काँग्रेस भवन येथून करण्यात आली. मात्र, मोर्चालाही माणसांची कमतरता भासली होती. गेल्या पंधरा दिवसांत इंधन दरवाढीने प्रचंड उच्चांक गाठला आहे. नजीकच्या काळात पेट्रोलचे दर शंभरी गाठतील. 

यामुळे सर्वसामान्यांचे जीवनच मेटाकुटीला आले आहे, पण राज्य आणि  केंद्र सरकारला याची फिकीर नाही, असे म्हणत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रत्नागिरी जिल्हा बंद पुकारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही या बंदला पाठींबा देत मोर्चात सहभाग घेतला होता. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, ‘मनसे’चे सुनील साळवी यांनी केले. काँगे्रस भवन येथून सुरु झालेला हा मोर्चा आठडाबाजार, तेलीआळी नाका, रामनाका, एसटी स्टँण्ड, जयस्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून मोर्चा पुढे बैलगाडीमधून कार्यकर्त्यानी जाहीर निषेध केला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजाभाऊ लिमये, छोटू चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर,यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘मनसे’, ‘बविआ’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

चिपळुणात निदर्शने

इंधन दरवाढ आणि महागाईच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला चिपळूण तालुक्यात प्रतिसाद मिळालाच नाही. दर सोमवारी बंद असणार्‍या बाजारपेठा गणेशोत्सवानिमित्त सुरू ठेवण्यात आल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत सोमवारी सकाळी 11 वा. निवेदन दिले. सोमवारी शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते. बाजारपेठ सुरू होती. तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंपदेखील नित्यनेमाने सुरू होते. या बंदचा एस.टी.वर देखील कोणताच परिणाम जाणवला नाही. काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश कदम, इब्राहिम दलवाई, लियाकत शाह, संदीप लवेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्‍ते शौकत मुकादम आदी पदाधिकार्‍यांनी  कार्यकर्त्यांसमवेत प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी केंद्रातील भाजप सरकारचा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. या नंतर प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांना निवेदन देण्यात आले. शहर व तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील सावर्डे, शिरगाव, पोफळी, रामपूर, मार्गताम्हाने या ठिकाणी बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही.