Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Konkan › ‘आई भराडी देवी नमो नमः’आंगणेवाडी भक्‍तिरसात न्हाली!

‘आई भराडी देवी नमो नमः’आंगणेवाडी भक्‍तिरसात न्हाली!

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 11:03PMश्री क्षेत्र आंगणेवाडी : संतोष अपराज, महेश कदम, मंगेश नलावडे

अखंड महाराष्ट्र राज्याचे दैवत असलेल्या व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होत देवीचे आशीर्वाद घेतले.‘आई भराडी देवी नमो नम:’ च्या जयघोषात आज आंगणेवाडी नगरी भक्‍तिरसात न्हाऊन निघाली. भाविकांनी आई भराडीचे दर्शन घेत नवस फेडले. मध्यरात्री तीन वाजल्यापासून देवीचे दर्शन आणि ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. भाविकांच्या आगमनाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर भक्‍तिमय बनला आहे.

आज दिवसभरात शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकारी, सिने-कलावंत यांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रात्री उशिरा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी परिसर बहरून गेल्याचे चित्र होते. आई भराडीच्या यात्रेसाठी गेले महिनाभर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने तसेच प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. यावर्षी प्रथमच आंगणेवाडीत कृषी महोत्सव तसेच सिंधु सरस प्रदर्शन भरविण्यात आल्याने कालच्या दिवसापासूनच भाविक आंगणेवाडीत दाखल होत होते. रात्री तीन वाजल्यापासून देवीच्या ओटी तसेच नवस बोलणे, फेडणेच्या कार्यक्रमास सुरुवात होणार असल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. रेल्वे, एसटी बसेस तसेच खासगी वाहनांमधून भाविक दुपारपासून आंगणेवाडीत दाखल होत होते. देवीच्या दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या पुलांवर भाविकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र मध्यरात्री पाहावयास मिळाले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. भाविकांना देवीचे दर्शन चांगल्यारीतीने व्हावे यासाठी नऊ रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्‍तींसाठी स्वतंत्र रांग होती. त्यामुळे भाविकांना देवीचे तत्काळ दर्शन घेता येत होते. 

पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ज्यांना केवळ देवीचे मुखदर्शन घ्यायचे होते अशा भाविकांसाठी आवश्यक सुविधा ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सकाळच्या सत्रातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या दर्शनानंतर कृषी प्रदर्शन तसेच गृहोपयोगी साहित्याची खरेदी करण्यावर भाविकांचा भर असल्याचे दिसून येत होते.
सकाळच्या सत्रात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, नीलम राणे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नीतेश राणे, आ. रवींद्र फाटक, खा. श्रीकांत शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आ. शिवराम दळवी, देवदत्त सामंत, अशोक सावंत, दीपक पाटकर, संतोष आचरेकर, सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, मंदार केणी, यतीन खोत, किरण पावसकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, सिने-कलावंत अरुण कदम यांच्यासह अन्य विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी देवीचे दर्शन घेतले.  मुंबई, ठाणे, वसई महापालिकेतील नगरसेवकांनीही भराडी मातेचे दर्शन घेतले. नवस बोलणे, फेडणे तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. 

यात्रेत कृषी प्रदर्शन तसेच सिंधु सरस महिला बचतगटांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच मालवण तसेच कणकवलीच्या दिशेने जिल्ह्यातील हॉटेल्स व्यावसायिक, मिठाई, अन्य गृहोपयोगी साहित्य, आकाश पाळणे, लहान मुलांना आकर्षून घेणारे विविध खेळ उभारण्यात आले होते. जिल्हा बँक, विविध राजकीय पक्षांचे स्वागत कक्ष, भाजपचे मोफत चष्मा वाटप उपक्रम, अरुण दुधवडकर यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या साईबाबांच्या लिलांवर आधारित हालता देखावा भाविकांचे खास आकर्षण ठरला होता. 

दुपारनंतर आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. भाविकांसाठी एसटी प्रशासनाच्यावतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मालवणवरून जाण्यासाठी एस. टी. बसस्थानक, टोपीवाला हायस्कूल, तारकर्ली, देवबाग, आनंदव्हाळ, सर्जेकोट, मालोंड, मसुरे येथून एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध आगारांमधून बसेसची सुविधा करण्यात आली होती. एसटी गाड्यांबरोबरच लक्झरी, खासगी सहाआसनी, तीनआसनी तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक यात्रेत दाखल होत होते.आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. आंगणेवाडीकडे जाणार्‍या मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. यात्रेसाठी मुंबईकर चाकरमानी आजही सकाळच्या सत्रात शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात दाखल होताना दिसत होते. यात्रेच्या निमित्ताने आरोग्य, महसूल यंत्रणा, पोलिस तसेच अन्य शासनाच्या विभागाचे कक्ष उभारण्यात आले होते. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सलग सुट्ट्यांमुळे गर्दीचा उच्चांक : आर्थिक उलाढाल वाढली
सलग सुट्ट्या आल्याने चाकरमान्यांबरोबर पर्यटकही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शहरातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. वाहतूक पोलिसांची नियुक्‍ती केली असतानाही सातत्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत होती. आंगणेवाडीत देवीचे दर्शन माघारी परतलेले भाविक शहरातील विविध पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत होते. त्यामुळे शहरासह, तारकर्ली, देवबाग, चिवला बीच येथील किनारपट्टी बहरून गेल्याचे चित्र होते. चाकरमानी, भाविक तसेच पर्यटकांमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक, मिठाई तसेच अन्य व्यावसायिकांची चांगली आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले. देवीच्या दर्शनानंतर भाविक कृतार्थ होऊन माघारी परतताना दिसत होते. 

महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर कर :भराडी देवीला साकडे

राज्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्यांना सुख मिळू दे. शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू दे असे साकडे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आई भराडीस घातले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या चांगल्या नियोजनामुळे भाविकांना सुलभरीत्या दर्शन घेता येत आहे. विकासाच्या बाजूने काम आमच्या हातून होऊ दे. असे गार्‍हाणे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घातले.  महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर कर. महाराष्ट्र हे विकसनशील राज्य होऊ दे. असे साकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भराडी मातेकडे घातले.