Sat, Nov 17, 2018 04:28



होमपेज › Konkan › भेट झाली पहा हो  भैरी-शिवाची!

भेट झाली पहा हो  भैरी-शिवाची!

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 9:08PM



रत्नागिरी ः प्रतिनिधी

काय वर्णू मी ही शोभा 
आज या दिनाची । 
भेट झाली पहा हो 
भैरी-शिवाची ॥ 
एक वर्षाचा हा काळ।
 पहा त्यांचा बंधुभाव ॥

राजीवडा येथील श्री देव काशिविश्‍वेश्‍वर व मांडवी येथील श्री देव भैरवाच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसर्‍या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्‍वेश्‍वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री देव काशिविश्‍वेश्‍वर मंदिर व मांडवी येथील श्री देव भैरव मंदिरामध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो, तर श्रावणाच्या दुसर्‍या सोमवारी या सप्ताहाची समाप्ती होते. सप्ताहाच्या समाप्तीनंतर दोन्ही मंदिरांमध्ये पालख्यांमधून दैवतांची मिरवणूक काढण्यात येते. मांडवी येथील श्री देव भैरव  राजिवडा येथे काशीविश्‍वेश्‍वराच्या भेटीला येतो.काशी विश्‍वेश्‍वराच्या नामसप्‍ताहाची सांगता दुपारी 12.30 वाजता होते. त्यानंतर पालखी मंदिराबाहेर येते. मंदिराच्या आवाराबाहेरील घाटीवरुन पाच प्रदक्षिणा पालखी घालते.  पालखीच्या तिसर्‍या प्रदक्षिणावेळी श्री भैरीच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला.

मांडवीतील भैरव देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर भडंगनाका, 80 फुटी हायवे नाका, बंदररोड, मुरलीधर मंदिर, काँग्रेसभुवन, विठ्ठल मंदिर, धमालणीचा पार, गोखलेनाका,  मारुती आळीतील मंदिर, पुन्हा गोखलेनाकामार्गे,  राधाकृष्ण नाका, रामआळी, तेलीआळी मार्गे, खडपेवठार येथून विश्‍वेश्‍वर घाटीवरुन आली. या घाटीमध्येच दोन्ही पालख्यांचे विणेकरी, मानकरी यांच्या भेटी झाल्यावर पालखी भेटीचा सोहळा रंगतो. यावेळी भाविकांकडून पुष्पवृष्टी केली जाते.

टाळ-मृदुंगांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर व भजनामध्ये भाविक दंग झाले होते. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी भेटीचा हा सोहळा रंगला. पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्यांच्या मानकर्‍यांनी श्रीफळ देऊन देवाची भेट घडवून आणली. मंदिरामध्ये गार्‍हाणे झाल्यावर श्री भैरवाची पालखी खडपेवठार, चवंडेवठार, विलणकरवाडी, घुडेवठार, दत्तमंदिरमार्गे मांडवी येथील  मंदिरात जाउन नाम सप्‍ताहाची सांगता होते. त्यानंतर दोन प्रदक्षिणा पूर्ण करत श्री देव काशी विश्‍वेश्‍वराची पालखी मंदिरामध्ये विसावली. या नामसप्ताहाच्या सांगता सोहळ्यामध्ये भाविकांनी देवाकडे समाजाच्या सुख-शांतीचे गार्‍हाणे घातले.