Wed, May 22, 2019 06:19होमपेज › Konkan › भडगाव ग्रा.पं.वर युतीचा झेंडा

भडगाव ग्रा.पं.वर युतीचा झेंडा

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:01PMकुडाळ : शहर वार्ताहर

गेली 20 वर्षे राणे समर्थकांची सत्ता असलेल्या कुडाळ तालुक्यातील भडगांव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत  निवडणूकीत  शिवसेना - भाजप युतीने थेट सरपंचपदासह चार जागांवर विजय मिळवित ग्रामपंचायतवर एक हाती युतीचा झेंडा फडकविला. थेट सरपंच निवडणूकीत युतीच्या  सौ. प्रणिता प्रसाद गुरव (359) यांनी स्वाभिमानच्या वर्षा विजय माळकर (322) यांचा पराभव करत विजय संपादन केला.  विजयी सरपंच  व सदस्यांचे सोमवारी कुडाळ शिवसेना शाखेत जल्‍लोषी स्वागत करण्यात आले.

 भडगाव बुद्रुक ग्रा.पं.ची रविवारी  सार्वत्रिक निवडणूक होवून सोमवारी निकाल जाहीर झाला. यात शिवसेना -भाजप  युती पुरस्कृत पॅनलचे सरपंच सौ. प्रणिता प्रसाद गुरव (359) यांच्यासह  सदस्य म्हणून शिवसेना आ. वैभव नाईक यांचे  स्विय्य सहाय्यक तुळशीदास (बाबी) रामचंद्र गुरव (139), प्रिया भरत गुरव (160), प्रमिला प्रमोद सावंत (102) व समिता  सूर्यकांत  भडगांवकर  (105) विजयी झाले. सरपंच व चार सदस्य युतीने विजयी करून विरोधकांच्या स्वाभिमानाला जोरदार धक्‍का दिला.

या सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना शाखेत शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख  राजन नाईक, महिला आघाडीप्रमुख सौ. जान्हवी  सावंत, जि.प. सदस्य संजय पडते,  युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला  आघाडी तालुकाप्रमुख सौ. शिल्पा घुर्ये, पं.स. सदस्या सौ. शरयु घाडी, सौ. शीतल  कल्याणकर, संदीप  म्हाडेश्‍वर, डॉ. प्रवीण सावंत, हितेश सावंत, शाखाप्रमुख राजेंद्र लोट, सुहास गुरव, महेश  गुरव, भरत गुरव, बाळा गुरव, सुभाष गुरव, रवि सावंत, गुणाजी लोट, आदीसह  कार्यकर्ते व ग्रामस्थ  उपस्थित होते. आ. नाईक यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.

अटीतटीच्या या लढतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्नेहल श्रीनिवास नाईक (170), नीलम प्रमोद लोट (165)व लक्ष्मण लोट (98) या प्रभाग 1 मधील तिनही सदस्यांनी विजय मिळविल्याची बातमी मतमोजणी केंद्राबाहेर येताच स्वाभिमानच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर आनंद तरळला. मात्र प्रभाग 2 व प्रभाग 3 मध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार निवडून आल्यामुळे स्वाभिमानच्या आनंदावर पाणी पडले. 

सर्वांच्या सहकार्याने विकासासाठी प्रयत्न करणार : सौ. प्रणिता गुरव

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील असून सर्वांच्या सहकार्याने  गावाचा विकास साधला जाईल असे नवनिर्वाचित सरपंच सौ. गुरव यांनी सांगितले. या ग्रा.पं. निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, महिला आघाडीप्रमुख सौ. सावंत, संजय पडते, हितेश सावंत, भाजपाचे काका कुडाळकर, लॉरेन्स मान्येकर यांनी विजयासाठी कंबर कसली तर स्नेहल श्रीनिवास नाईक, प्रणिता  प्रमोद लोट व लक्ष्मण बाबू लोट हे तीन स्वाभिमानचे सदस्य निवडून आले.