Sat, Jul 20, 2019 09:12होमपेज › Konkan › शिक्षकांचा पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

शिक्षकांचा पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

Published On: Mar 05 2018 9:23PM | Last Updated: Mar 05 2018 9:13PMरत्नागिरी : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पेपर तपासणीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. यातील शालार्थ प्रणालीत शिक्षकांच्या नावांचा समावेश करण्यासाठी विशेष कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. डीसीपीएससाठी गेल्या 12 वर्षांचा शासनाचा हिस्सा 1182 कोटी रुपये व व्याजासाठी 130 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मूल्यांकनास पात्र 123 कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळा व 23 तुकड्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तातडीने जाहीर करण्यात येणार आहे. एमए, एम. फिल, पीएच.डी. साठी कर्तव्य रजा मंजूर करण्यात आली. 42 दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा करण्यात येतील आणि 2 मे 2012 नंतर नियुक्‍त शिक्षकांना नियुक्‍ती मान्यता व वेतन देण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान, उर्वरित मागण्यांबाबत 10 मार्च रोजी अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच 2011-12 पासूनच्या वाढीव पदांना मान्यता देणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करणे या व इतर मागण्यांसाठी महासंघाबरोबर अधिवेशन संपल्यानंतर तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी महासंघाला कळवले आहे. यामुळे राज्यातील सर्व 72 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी व महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.