Sat, Dec 07, 2019 15:10होमपेज › Konkan › उमेदवारीचे ‘कमळ’ माने, खेतल की खेराडेंच्या हातात?

उमेदवारीचे ‘कमळ’ माने, खेतल की खेराडेंच्या हातात?

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 7:49PMचिपळूण : खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधीच चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये अनेकांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. या आधीच भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी चिपळूणमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ भाजप जिल्हाध्यक्षपदाचे पद मिळालेले उद्योजक तुषार खेतल यांनीही या मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे. या आधी जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सुरेखा खेराडे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सेनेकडून विद्यमान आ. सदानंद चव्हाण यांनाच उमेदवारी मिळणार आहे तर राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम हे रिंगणात उतरणार आहेत. या चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. चार महिन्यांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी चिपळूणमध्ये अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मोठा इव्हेंट केला आणि आपले प्रमोशन करण्याचा  प्रयत्न केला. यानंतर चिपळूणमधून भाजपच्या चिन्हावर माने निवडणूक लढविणार या चर्चेला जोर आला. चर्चा अजूनही सुरुच असून त्यांनी सातत्याने चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यात दौरे वाढविले. येथील नगर परिषद, नगर पंचायत तसेच जि. प., पं. स. निवडणुकीतही संपर्क ठेवला व आपण या स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे. 

आता मात्र भाजपमध्ये अन्य काही इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली  आहेत. सुरुवातीला मतदारसंघातील कुणबी फॅक्टर लक्षात घेऊन जनतेतून निवडून आलेल्या चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचे नाव विधानसभेसाठी निश्‍चित होईल, अशी चर्चाही रंगली होती. काही काळ मतदारसंघात असे वारेही शिरले होते. त्यामुळे पक्ष या बाबत कोणता निर्णय घेईल, हे येणारा काळ ठरविणार आहे. 

आता जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहे. चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातून आणखी एक ना पुढे आले आहे. मुंबईतील उद्योजक तुषार खेतल हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्या  दृष्टीने तयारी कण्यासाठी मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला आहे. मुंबई येथे मतदारसंघातील चाकरमान्यांच्या भेटीगाठी व बैठक सुरू झाल्या आहेत. 

या शिवाय संगमेश्‍वर तालुक्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षवधेधी इरत आहे. त्यांच्या उमेदवारीला समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभेसाठी खेतल यांनीदेखील आपला दावा केला आहे. भाजप निवडणुकीसाठी माने, खेतल की खेराडे यापैकी कोणाच्या हातात ‘कमळ’ देते याची उत्सुकता मतदारसंघात लागून राहिली आहे.