Sat, Dec 07, 2019 13:58होमपेज › Konkan › ‘फेक’ आमिषांपासून रहा सावध

‘फेक’ आमिषांपासून रहा सावध

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 8:48PM

बुकमार्क करा

कणकवली : नितीन कदम

तुम्हाला अमूक लाख पौंडाचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी तुमची वैयक्‍तिक माहिती द्या, असा संदेश किंवा कॉल येताच सामान्यतः आपण हुरळून जातो. मात्र, यामुळे निव्वळ आपली फसगत होते. या‘फेक’ आमिषांना  आळा घालण्यासाठी आता स्वतः रिझर्व्ह बँकेनेच पुढाकार घेत मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत एसएमएसद्वारे संदेश प्रसारित केले जाणार आहेत. याशिवाय ‘मिस्ड-कॉल हेल्पलाईन’ सुद्धा रिझर्व्ह बँकेने सुरू केली आहे.

अशा प्रकारच्या फसव्या संदेशामुळे आपल्या बँक खात्यातील रक्कम परस्पर कुणीतरी काढली, अशा आशयाच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे सतत येत असतात.  विशेष म्हणजे अशाप्रकारे फसवणूक करणारे भामटे आपण स्वतः रिझर्व्ह बँकेचा प्रमुख किंवा संबंधित व्यक्‍तीचे बँक खाते असलेल्या बँकेच्या प्रधान कार्यालनयातून बोलत असल्याचे भासवतात. डॉलरच्या रुपात बक्षीस लागल्याचे सांगत ग्राहकाकडून हे चोरटे त्याचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, एटीएम पासवर्ड,  पत्ता, बँक खाते क्रमांक आदी माहिती घेततात. त्या नंतर संगणकाच्या सहाय्याने संबंधिताच्या खात्यातील रक्कम परस्पर हडप करतात. या प्रकारच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी लोकांना सावध केले आहे. तरीही काही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्याने आता रिझर्व्ह बँकेनेच याविरोधात मोहीम हाती घेतली आहे.

यामध्ये ज्याला बक्षिसांचा ईमेल किंवा एसएमएस आला असेल त्याने रिझर्व्ह बँकेला एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. हा मिस्ड कॉल रिझर्व्ह बँकेंच्या हेल्पलाईनकडे जाणार आहे. या हेल्पलाईनवरून संबंधित नागरिकाला दक्षता कशी घ्यायची ते सांगितले जाईल. त्याचवेळी नागरिकांची तक्रार नोंदवून ती स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठवली जाईल. यासाठी रिझर्व्ह बँकेने  sachet.rbi.org.in  ही विशेष वेबसाईट विकसित केली आहे.

रिझर्व्ह बँक कोणत्याही नागरिकांच्या नावे कधीही खाते उघडत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने कोणत्याही रक्‍कमेची मागणी करणे संभवत नाही. त्याचप्रमाणे बँक नागरिकांकडून त्याचा बँक विषयक तपशील कधीही मागवत नाही. रिझर्व्ह बँक आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून हाच संदेश लोकांना  देणार आहे. असाच संदेश एसएमएसद्वारेही पाठवला जाणार आहे.

अशी होते फसवणूक

मोठया रक्‍कमांचे बक्षीस तुम्हाला मिळाले आहे, हे सांगण्यासाठी अनेक चोरांकडून (फ्रॉडस्टर्ड) संबंधित नागरिकांला थेट कॉल केला जातो. याशिवाय असे एसएमएस किंवा ईमेलही पाठवले जातात. या ईमेलना ‘फिशिंग मेल’ म्हणतात. यामध्ये बव्हंशी लॉटरी लागल्याचे किंवा तुमची निवड बक्षिसासाठी झाल्याचे सांगितले जाते. हे बक्षीस मिळवायचे असेल तर अमुक  इतकी रक्‍कम जमा करायला सांगितले जाते. सामान्य लोक या संदेशाना भुलतात आणि आपली वैयक्‍तिक माहिती बँक खात्यासह देतात. यामुळे चोरांचे फावते. कदाचित अशाप्रकारे संदेश पाठवणार्‍यांमध्ये अतिरेकी, आयएस संघटना किंवा स्थानिक चोर यांचा समावेश असतो. या संदेशांना भुलू नका, असे वारंवार रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

फसवणूक कॉल आल्यास येथे संपर्क साधा

बक्षिसांच्या बदल्यात कधीही कुणालाही रक्‍कम देऊ नये. रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर किंवा सरकार यापैकी कुणीही बक्षिसाचे ईमेल पाठवत नाही किंवा तसे एसएमएसही करत नाही हे लक्षात ठेवा. असे मेल किंवा एसएसएस आल्यास रिझर्व्ह बँकेला 8691960000 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.