Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Konkan › बँक कर्मचार्‍यांची जोरदार निदर्शने

बँक कर्मचार्‍यांची जोरदार निदर्शने

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सुमारे दहा लाखांहून अधिक संख्येने सहभागी असलेल्या बँक अधिकारी व कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप दुसर्‍या दिवशीही पूर्णतः यशस्वी झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून राबविण्यात आलेल्या सर्व महत्त्वपूर्ण योजना, जनधन खाती, मुद्रा कर्ज योजना, निश्‍चलीकरण, अटल पेन्शन, विमा सुरक्षा, सबसिडी वाटप या सर्व राष्ट्रीयीकृत म्हणजेच भारत सरकारच्या मालकीच्या बँकांतून राबविण्यात आल्या. बँक कर्मचारी व अधिकारी यांचेच योगदान या सर्व योजना राबविण्यामध्ये आहे. या प्रक्रियेत बँक कर्मचार्‍यांच्या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात सरकारने 2 टक्के एवढी अत्यल्प पगारवाढ देऊ करुन बँक कर्मचार्‍यांची थट्टाच केली आहे. हे करत असताना बँकर्सनी बँका तोट्यात असल्याचा आधार घेतला आहे. ज्यावर संघटनांचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात येत आहे.

आजही संपकरी कर्मचार्‍यांनी सरकारच्या धोरणांविरोधात व बँकर्सच्या धोरणाविरोधात घोषणा दिल्या. कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या नेत्यांनी सर्वप्रथम ग्राहकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्‍त केली. संघटनांच्या वतीने संपकरी कर्मचारी व अधिकार्‍यांचे त्यांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल समाधान व्यक्‍त करण्यात आले.