रत्नागिरी : प्रतिनिधी
बंजारा (लमाणी) समाजाचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंजारा बहुउद्देशीय सेवा संघातर्फे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
बंजारा समाजातील नागरिकांना वसंतराव नाईक तांडा वस्ती अंतर्गत असलेल्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याकरिता कृती कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, जातीच्या दाखल्यासंदर्भात असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालयाचे उपशिक्षक अनिल चव्हाण यांच्यावर मुख्याध्यापक पदासंदर्भात झालेला अन्याय त्वरित दूर करण्यात यावा, झाडगाव येथील झोपडपट्टीवासियांच्या झोपड्यांना नियमित करून त्यांना वीजमीटर तसेच अन्य भौतिक सुविधा पुरवाव्यात, त्यांना रेशन कार्ड द्यावे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचा लाभ द्यावा, शैक्षणिक स्तरावरील अडचणी सोडवाव्यात.
शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर कराव्यात या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याचे बंजारा बहुउद्देशीय सेवा संघाच्या जिल्हा उपध्यक्षा गीता राठोड यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.