Tue, Jul 16, 2019 12:11होमपेज › Konkan › बांदा बाजारपेठेत अस्ताव्यस्त वाहने लावणार्‍यांवर होणार कारवाई

बांदा बाजारपेठेत अस्ताव्यस्त वाहने लावणार्‍यांवर होणार कारवाई

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:13PM

बुकमार्क करा

बांदा : वार्ताहर

बांदा गांधीचौक ते उभाबाजार या मुख्य वर्दळीच्या असणार्‍या बाजारपेठेत वाहतूक कोंडीची उद्भवणारी समस्या दूर करण्यासाठी आता कठोर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. बांदा पोलीस,  ग्रामपंचायत आणि बांदा व्यापारी संघ यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन तीन दिवसात ध्वनिप्रक्षेपकातून आवाहन करून त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

गांधीचौक-उभा बाजार ही मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी सतत वर्दळ असते. गोवा राज्यातील ग्राहकही मोठ्या संख्येने बांद्यात खरेदीसाठी येतात.मात्र बांद्यात पार्किंगची मोठी समस्या असल्याने वाहने दुकानासमोर लावली जातात. यात प्रमुख्याने दुकानातील  कामगारांच्या गाड्यांचा सामावेश आहे. वारंवार याबाबत अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, परिस्थिती जैसे थे होती. बांदा सरपंच बाळा आकेरकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने हा मार्ग राहदारीस सुरळीत करण्याचे पत्र पोलीस स्थानकाला दिले होते.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

जि. प. सदस्य सौ. श्‍वेता कोरगावकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, सरपंच बाळा आकेरकर, बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर, डॉ.भालचंद्र कोकाटे, सुधीर शिरसाट, संदेश पावसकर, अनिल नाटेकर, सर्वेश गोवेकर, विवेक विरनोडकर, राजेश विरनोडकर, अमेय पावसकर, अन्वर खान, राकेश केसरकर, सतीश येडवे, आशुतोष भांगले, नंदू कल्याणकर, विशांत पांगम आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक कळेकर यांनी बाजारपेठेत ग्राहकांना येण्यास अडचण निर्माण झाली नाही तर बाजारपेठेत वर्दळ कायम राहील यासाठी व्यापारी वर्गाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करायला वेळ लागत नाही, मात्र समस्या सुटणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सुरुवातीला सर्वेश गोवेकर यांनी गांधी चौकात यापूर्वी करण्यात आलेल्या पार्किंग संबंधित उपाय योजनांकडे लक्ष वेधत कठोर कारवाई न झाल्यानेच पुन्हा गांधी चौकात पार्किंगच्या जागेवर दुकाने थाटली गेल्याचे सांगत ग्रामपंचायतीने योग्य पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सुधीर शिरसाट यांनीही या ठिकाणची जागा मोकळी केल्यास या ठिकाणी दुचाकी पार्किंगची समस्या मिटेल असे सांगितले.

यावेळी उपस्थित व्यापार्‍यांनी पोलिसांनी दुकानासमोर लावलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. कचरा गाडी बाजारपेठेत आली तर केवळ या वाहनांमुळे रहदारी खोळंबते, असे सांगत आता कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आशुतोष भांगले यांनी व्यापारी संघाच्या जागेत मंगल कार्यालय सुरू करण्यात आले असून यामुळे येथे पार्किंगची समस्या भेडसावत असून हे मंगलकार्यालय पार्किंग व टॉयलेटसाठी खुले करण्याची मागणी केली. यावर सर्वेश गोवेकर यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने बैठकीत वातावरण गरम झाले. भांगले यांच्या मुद्यावर गोवेकर यांनी स्पष्टीकरण देत लाखो रुपये खर्च करून आम्ही व्यापारी संघाकडून ही जागा भाडेतत्वावर घेतली आहे. मग ज्यावेळी बंद असेल त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही दुसर्‍यांना वापरण्यास कशी परवानगी देणार? घर बंद असले तर घरातील टॉयलेट वापरण्यास देतात का असा सवाल उपस्थित करीत भांगले यांचे मुद्दे परतवून लावले. यावर व्यापारी संघाने गोवेकर यांची बाजू योग्य असल्याचे सांगितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

  दरम्यान येत्या दोन दिवसात लाऊड स्पीकरने जाहीर पुकार करून बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांना गटारावर असलेले सामान परत न लावणे, दुचाक्या व वाहने इतर ठिकाणी पार्क करणे, गांधी चौकातील फळवाले, भाजीवाले यांनी ती जागा खाली करावी यासाठी सूचना करणार असून त्यानंतर तीन दिवसांनी धडक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.तसेच ज्या दुकानांचे पत्रे गटाराच्या बाहेर आले आहेत, गटाराबाहेर ज्यांनी पायर्‍या बांधल्या आहेत त्यांनाही सक्त सूचना करण्यात येणार असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ठराव घेण्यात आले. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी ग्रामपंचायत आणि व्यापारी संघाने सहकार्य दिले तर हा प्रश्‍न सुटणार असल्याचे सांगत जाहीर आवाहन करून झाल्यावर बेशिस्त वाहने लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.