होमपेज › Konkan › परप्रांतीय बोटींनाही एलईडी बंदी करा

परप्रांतीय बोटींनाही एलईडी बंदी करा

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 9:13PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

परप्रांतीय मच्छीमार बोटी जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रात येऊन एलईडी प्रकाशझोतात मासेमारी करतात. एका ठराविक टापूत सुरूवातीला हजारात नंतर रोज 150 ते 200 बोटी येथील मासा मारून नेणार्‍यांवर कारवाई होत नाही. परंतु, येथील मच्छीमारांवर एलईडी वापरण्यास बंदी या नियमास आमचा विरोध नाही पण जिल्ह्याच्या सागर क्षेत्रात येऊन एलईडी मासेमारी करणार्‍या परप्रांतीय बोटींनाही बंदी करावी, अशी मागणी रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मच्छीमार मालक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहआयुक्‍त राजेंद्र जाधव यांची भेट घेऊन केली.

मत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्‍त राजेंद्र जाधव मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. शंख, शिंपले, कालवे संवर्धन कार्यशाळेसाठी सह आयुक्‍त आले असल्याचे कळताच असोसिएशनचे पदाधिकारी विकास ऊर्फ धाडस सावंत, नासीर वाघू, जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, जितू बिर्जे, मुनाफ होडेकर, पुष्कर भुते आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो मच्छीमारांनी त्यांची सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. पर्ससीन नेट मच्छीमारांवर होणारे आरोप, एलईडी मासेमारी बंदी व मत्स्य दुष्काळाची कारणे, मच्छीमार संघर्ष याबाबत असोसिएशनची बाजू मांडली. यावर सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची मुंबईत संयुक्‍त बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या आश्‍वासनासह आयुक्‍तांनी दिले.

मोठमोठ्या कंपन्यांचे दूषित पाणी समुद्रात सोडले जाते. पावसाळा संपल्यानंतर लगेचच सुमारे 900 ते 1000 इतक्या परप्रांतीय बोटी जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी येतात. डिसेंबरपासून हे प्रमाण कमी होते पण रोज सुमारे 150 ते 200 परप्रांतीय बोटी मासेमारी करतातच. या बोटी बहुतांश मासा पकडून नेतात. त्यांना एलईडी वापरण्यास बंदी नाही. पण आमच्याच समुद्रात आम्हाला एलईडी वापरास बंदी हा अन्याय असल्याचे असोसिएशनचे नेते धाडस सावंत, जावेद होडेकर, नासिर वाघू यांनी सह आयुक्‍त जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात सविस्तर निवेदनही देण्यात आले. हेच निवेदन जिल्हाधिकार्‍यांनाही देण्यात आले.

परप्रांतीय मच्छीमार बोटी सरसकट मासेमारी कोठे करतात हे सुद्धा सह आयुक्‍तांना सांगण्यात आले. दाभोळ ते मालवण दरम्यान समुद्रात 35 ते 40 वावमध्ये एक टापू (समुद्रातील डोंगर) आहे. या डोंगरावर झाडे आहेत. या झाडांवरील खाद्य समुद्रात पडते. येथे मोठ्या प्रमाणात मासे खाद्यासाठी येतात. ही मासळी परप्रांतीय बोटी मोठ्या प्रमाणात पकडतात. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी कोणी जात नाही. आम्हाला मात्र गाळ उरतोय. त्यामध्येही आमच्यावर बंधने लादली जात आहेत. आम्ही जगायचे कसे? असा भावनिक सवालही असोसिएशनने सह आयुक्‍त जाधव यांच्यासमोर उपस्थित केला.